काळेभोर केस हे तारुण्याचे लक्षण असते. केसांच्या निरनिराळ्या हेअरस्टाईल्स करणे ही तरुणाईची आवडती गोष्ट असते. पण ऐन विशी-पंचविशीत अचानक या केसात पांढऱ्या तारा डोकावू लागल्या तर? आपण आता म्हातारे दिसू लागणार, या विचारांनी अनेक युवक-युवतींची झोप उडते, खाण्यापिण्यातला इंटरेस्ट जातो आणि ग्रुपबरोबर बाहेर पडायला टाळाटाळ व्हायला लागते. केस अकाली पांढरे होण्यामागे अनेकदा आनुवंशिक कारणे असतात. त्यासाठी काही करता येणे शक्य नसते. पण अशी इतर अनेक कारणे आहेत, की आपण टाळली तर भर यौवनात येणाऱ्या या म्हातारपणाला दूर ठेवता येईल.

१. ताणतणावांचे नियोजन- सतत टेन्शनमध्ये वावरल्याने केस पांढरे व्हायला लागतात. आजच्या जीवनशैलीत हे तणाव टाळता येणे अशक्य असते. पण त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य असते. त्यासाठी मैदानी खेळ, मेडीटेशन, करमणूक आणि आनंद मिळवण्यासाठी विविध कलांचे छंद जोपासणे हे पर्याय वापरता येतात.

२. व्यसने- धूम्रपान, मद्यपानासारखी व्यसने असल्यास केस पांढरे होतातच. एवढेच नाही तर चहा, कॉफी, कोला पेये अशांसारखी रोजच्या रोज घेतली जाणारी पेयेसुद्धा जास्त प्रमाणात घेतल्यास केसांना मारक ठरतात. या गोष्टी सोडणे अशक्य नाही, पण महाकर्मकठीण असतात. त्यामुळे या सर्व व्यसनांपासून आधीपासूनच चार हात दूर राहणे श्रेयस्कर.

३. तेलकट आणि मसालेदार पदार्थ- भजी, वडे, सामोसे, तळलेले पापड, वेफर्स, चिप्स, कटलेट तसेच ज्यामध्ये चीज, लोणी, बटर वापरले जातात असे पदार्थ रोजच्या रोज खात राहण्याने शरीरातील कोलेस्टेरॉल वाढते, आणि या वाढत्या कोलेस्टेरॉलचा केस पांढरे होण्याशी संबंध असतो. साहजिकच हे पदार्थ समोर आल्यावर त्यांना ‘नाही’ म्हणावे. तेलकट आणि मसालेदार पदार्थ वेगळे नसतात. या चमचमीत पदार्थांनाही नकार द्यावा.

४. आंबट आणि खारट – असे पदार्थ टाळावेत.

५. संतुलित आहार – फळे, बदाम, अक्रोड या पदार्थांचा आहारात संतुलित समावेश ठेवावा. कडधान्ये, मोड आलेली धान्ये, उसळी, पालेभाज्या यांचा समावेश आहारात नियमित स्वरूपात असायला हवा. यामुळे बी, सी अशी जीवनसत्वे आणि तांबे, लोह यासारखी खनिजे मिळतात.

६. नियमित व्यायाम- धावणे, जॉगिंग, पोहोणे, टेकडीवर जाणे, सायकल चालवण्यासारख्या एरोबिक व्यायामांनी आणि ट्रेकिंग, नृत्य अशा कलांनी, मैदानी खेळांमुळे आपला फिटनेस चांगला राहून, सर्व शरीरातला रक्तप्रवाह उत्तमपैकी वाढून केसांच्या मुळांना जास्त पोषणमूल्ये मिळतात.

७. औषधे- केस काळे राहण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेल्या जीवनसत्वांची माहिती डॉक्टरांकडून घेऊन त्यांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन सप्लिमेंट्स घ्याव्यात.

८. केशतेल- रासायनिक क्रीम्स, जेल्स वापरणे टाळावे. त्याऐवजी नियमित स्वरूपात खोबऱ्याचे तेल वापरावे. त्यात कढीपत्ता टाकून द्राव तयार केल्यास केस पांढरे होत नाहीत. भारतातील वेगवेगळ्या राज्यात केस राहण्यासाठी पिढ्यानपिढ्या आवळा तेलात दही आणि लिंबांचा द्राव, बदाम आणि आवळ्याच्या तेलाचे मिश्रण, कांद्याचा रस वगैरे वापरतात. पण कुठल्याही रासायनिक पदार्थांपेक्षा या गोष्टी जाणकारांच्या सल्ल्याने वापरणे हितकारक ठरते.

डॉ.अविनाश भोंडवे, फॅमिली फिजिशियन