अरुणाचलमधल्या जांभळ्या रंगाच्या दुर्मिळ चहापत्तीची प्रथमच विक्री करण्यात आली आहे. ‘गुवाहटी टी ऑक्शन सेंटर’मध्ये पहिल्यांदाच देशातील पहिल्या ‘पर्पल टी’ची विक्री करण्यात आली. प्रतिकिलोसाठी २४ हजारांहून अधिकची बोली यावेळी लावण्यात आली. दुगर कन्झ्युमर प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं हा दुर्मिळ जांभळ्या रंगाचा चहा खरेदी केला आहे. पुढील वर्षी अहमदाबादमध्ये होणाऱ्या एका परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगभरातील पाहुण्यांच्या चहापान कार्यक्रमासाठी तो वापरण्यात येणार आहे.
या चहाची चव ही काहीशी ग्रीन टी सारखीच असल्याचं म्हटलं जात आहे. काही वर्षांपूर्वी अरुणाचलमधल्या घनदाट जंगलात या चहापत्तीचा शोध लागला. जवळपास १० हजार किलो पानांपासून १ किलो चहापत्ती तयार केली जाते. या चहाच्या रोपांमध्ये मोठ्या प्रमाणात अँथोसायनिन असतं. यामुळे चहापत्तीला गडद जांभळा रंग प्राप्त होतो. काही महिन्यांपूर्वी याच टी ऑक्शन सेंटरमध्ये आसामी चहावर तब्बल ३९ हजारांची बोली लागली होती. १ किलो मनोहारी गोल्डन टीवर जवळपास ३९ हजारांची बोली लावण्यात आली होती. गुवाहटीस्थित एका चहा विक्री करणाऱ्या व्यापारानं ती खरेदी केली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 30, 2018 4:44 pm