Realme कंपनीने बुधवारी भारतात आपल्या रिअलमी 8 सीरिजमधील दोन स्मार्टफोन लाँच केले. कंपनीने Realme 8 आणि Realme 8 Pro हे दोन नवीन स्मार्टफोन आणले आहेत. यातील रिअलमी 8 प्रो स्मार्टफोनमध्ये कंपनीने तब्बल 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. यासोबतच Realme 8 Pro हा आता भारतातील 108 MP क्षमतेचा कॅमेरा(मुख्य कॅमेरा) असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन ठरला आहे. आतापर्यंत रेडमी नोट 10 प्रो मॅक्स हा भारतातील 108 MP क्षमतेचा कॅमेरा(मुख्य कॅमेरा) असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन होता. पण, बुधवारी रिअलमीने Realme 8 Pro हा स्मार्टफोन २० हजारापेक्षा कमी किंमतीत लाँच केल्यामुळे आता Realme 8 Pro हा भारतातील सर्वात स्वस्त 108 MP क्षमतेचा कॅमेरा(मुख्य कॅमेरा) असलेला स्मार्टफोन ठरला आहे.

Realme 8 Pro स्पेसिफिकेशन्स :
हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर आधारित रिअलमी यूआय 2.0 वर कार्यरत आहे. फोनमध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले असून क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसरचा सपोर्ट आहे. स्मार्टफोनमध्ये 8 जीबीपर्यंत रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे, शिवाय माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज वाढवण्याचा पर्यायही आहे. फोटोग्राफीसाठी रिअलमी 8 प्रो स्मार्टफोनच्या मागील बाजूला 108 मेगापिक्सेल क्षमतेचा सॅमसंग ISOCELL HM2 प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल, 2 मेगापिक्सेल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सेल ब्लॅक अँड व्हाइट सेन्सर असा क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल-बँड वाय-फाय, 4G, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि युएसबी टाइप-सी पोर्ट असे फिचर्स आहेत. शिवाय फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरही आहे. तसेच, 65W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 4500mAh क्षमतेची बॅटरी यात दिली आहे. ही बॅटरी २० तासांपर्यंत युट्यूब व्हिडिओ बघण्याचा बॅकअप देते, शिवाय ८ तासांपर्यंत गेम खेळण्याचा बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे.

Realme 8 Pro: किंमत 
रिअलमी 8 प्रोच्या 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 17 हजार 999 रुपये आहे. तर, 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 19 हजार 999 रुपये आहे. हा फोन इन्फिनिटी ब्लॅक आणि इन्फिनिटी ब्लू अशा दोन रंगांमध्ये खरेदी करता येईल.