शाओमीने Redmi K20 Pro हा स्मार्टफोन नुकताच लाँच केला होता. त्यानंतर आता कंपनीने या स्मार्टफोनसाठी विशेष आवृत्ती लाँच केली आहे. Redmi K20 Pro Premium Edition नावाने आणलेल्या या स्मार्टफोनमध्ये कंपनीने काही बदल केलेत. Redmi K20 Pro Exclusive Edition स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855 प्लस प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये 12 जीबीपर्यंत रॅम आणि 512 जीबीपर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. क्वालकॉम प्रोसेसर, अधिक रॅम आणि अधिक स्टोरेज इतकाच नव्या आणि जुन्या K20 Pro मध्ये फरक आहे. याशिवाय कंपनीने रेडमी के20 प्रोमध्ये एक नवीन कलर व्हेरिअंट सादर केलं आहे. सध्या हा Redmi K20 Pro Premium Edition चीनमध्येच लाँच करण्यात आला आहे.

चीनमध्ये या स्मार्टफोनसाठी प्री-बुकिंगला सुरूवात झाली असून 23 सप्टेंबरपर्यंत प्री-बुकिंग करता येणार आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळासह TMall, JD.com आणि Suning यांसारख्या अन्य ई-कॉमर्स पोर्टलवर या फोनसाठी प्री-बुकिंग सुरू आहे.
ग्लेशियर ब्ल्यू, फ्लेम रेड, कार्बन ब्लॅक, वॉटर हनी आणि नवीन कूल ब्लॅक मेक एडिशन अशा पाच रंगांचा पर्याय या फोनसाठी आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये 4,000 एमएएच क्षमतेची बॅटरी असून तीन रिअर कॅमेरे आहेत. यातील 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. तर दोन कॅमेरे 13 आणि 8 मेगापिक्सल क्षमतेचे आहेत. सेल्फी आणि व्हीडिओसाठी यामध्ये 20 मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे.

रेडमी के20 प्रोच्या या विशेष आवृत्तीमध्ये एकूण तीन व्हेरिअंट आहेत. यातील 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 2,699 चीनी युआन (जवळपास 27,000 रुपये), 8 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 2,999 चीनी युआन (जवळपास 30,000 रुपये), आणि 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 3,199 चीनी युआन (जवळपास 32,000 रुपये) आहे. मात्र, भारतात हा फोन केव्हा लाँच होणार याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पण लवकरच भारतीय बाजारातही हा स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता आहे.