भारतातच नाही तर जगभरात वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्स अॅप या मेसेजिंग अॅपबद्दल धक्कादायक खुलासा जर्मन क्रिप्टोग्राफरच्या एका टीमनं केला आहे. व्हॉट्स अॅप ग्रुपमधल्या चॅट सुरक्षित नसून सर्व्हर हॅक करून कोणीही या चॅट्स वाचू शकतो, तुमच्या ग्रुप चॅटमध्ये ढवळाढवळ करू शकतो असं या टीमने केलेल्या संशोधनातून समोर आलं आहे.
नुकतीच स्विर्त्झलँडमध्ये ‘रियल वर्ल्ड क्रिप्टो सिक्यॉरिटी कॉन्फ्रेंस’ पार पडली. यात जर्मन क्रिप्टोग्राफरच्या एका टीमनं आपला संशोधन प्रबंध सादर करून धोक्याचा इशारा व्हॉट्स अॅपला दिला आहे. या अॅपचा सर्व्हर कंट्रोल ज्या व्यक्तीच्या हाती असेल ती व्यक्ती ग्रुप अॅडमिनची परवानी न घेता अनोळखी व्यक्तीला ग्रुपमध्ये अॅड करू शकते. ही व्यक्ती ग्रुपमध्ये सुरु असलेल्या चॅट सहज वाचू शकते, तिथून हवी असलेली माहिती देखील चोरू शकते असं या टीमनं संशोधनात म्हटलं आहे. फक्त बाहेरील व्यक्तीच नाही तर खुद्द व्हॉट्स अॅपदेखील आपल्या युजर्सच्या ग्रुप चॅटवर नजर ठेवू शकतो असंही या टीमनं म्हटलं आहे. पण व्हॉट्स अॅपनं मात्र हा दावा खोडून काढला आहे. व्हॉट्स अॅपच्या चॅट ह्या एंड-टु-एंड एनक्रिप्शन सेफ आहेत असं व्हॉट्स अॅपचं म्हणणं आहे.
पण, तरीही या टीमनं दिलेल्या इशाऱ्याची आम्ही पूर्णपणे दखल घेऊन व्हॉट्स अॅप अधिकाधिक सुरक्षित बनवू असं व्हॉट्स अॅपनं स्पष्ट केलं आहे. व्हॉट्स अॅप हे सध्याच्या घडीला भारतात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप आहे. तर जगभरात ५० विविध भाषांमध्ये व्हॉट्स अॅप हे अॅप उपलब्ध असून अब्जावधी लोक हे अॅप वापरत आहेत. एकदा का व्हॉट्स अॅपच्या सर्व्हरवर ताबा मिळवला की एखाद्या व्यक्तीकडून येणारे मेसेज ब्लॉक करणं किंवा परस्पर कोणाला काय मेसेज पाठवणं हे सहज शक्य असल्याचं रूहर विद्यापिठाच्या संशोधकांचं म्हणणं आहे.