मिठाचा प्रमाणाबाहेर वापर हा आरोग्यास हानीकारक असल्याचे आपण आजवर ऐकत आलो आहोत. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मिठाचे सेवन कमी करावे असा सल्ला डॉक्टर देतात. पण मीठ आरोग्यासाठी वाटते तितके हानीकारक नाही, असे नव्या संशोधनातून दिसून आले आहे. योग्य प्रमाणात मीठ सेवन केल्याने शरीराला उपयोगीच ठरते असे संशोधकांचे म्हणणे आहे. याविषयीचे संशोधन लॅन्सेट या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

द प्रॉस्पेक्टिव्ह अर्बन रुरल एपीडेमिओलॉजी (प्युअर) स्टडी नावाने हे संशोधन करण्यात आले. त्यात १८ देशांतील ३०० जनसमुदायांमधील ९०,००० लोकांचा ८ वर्षांसाठी अभ्यास करण्यात आला. या लोकांच्या आहारातील मिठाचे प्रमाण आणि त्याचा आरोग्यावरील परिणाम अभ्यासण्यात आला. त्यातून असे दिसून आले की मीठ आजवर समजले जात होते तितके हानीकारक नाही.

जास्त मिठामुळे रक्तदाब वाढतो हे खरे असले तरी दररोज प्रमाणाबाहेर मीठ खात राहिल्यास तो परिणाम होतो. ज्या जनसमुदायांमध्ये दररोज अडीच चमचे मीठ किंवा ५ ग्रॅम सोडियम खाल्ले जाते त्यांनाच रक्तदाब किंवा स्ट्रोकचा धोका उद्भवतो, असे या अभ्यासात निष्पन्न झाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार लोकांनी दररोज २ ग्रॅमपेक्षा कमी सोडियम आहारात घ्यावे. तर अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या सल्ल्यानुसार दररोज २.३ ग्रॅम सोडियम खावे. रोज १.५ ग्रॅम सोडियम हे आदर्श प्रमाण आहे.

अति कमी किंवा अत्यधिक मिठाचे सेवन आरोग्यास हानीकारक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. तसेच या संशोधनाचे निष्कर्ष जनसमुदायावरील अभ्यासातून आले आहेत, त्यामुळे ते व्यक्तींना तसेच्या तसे लागू पडणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले.