लॅपटॉपमधून मेसेज करता येत नाही, ही जर तुमचीही समस्या असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आघाडीची टेक कंपनी सॅमसंग एका नवीन सर्व्हिसवर काम करत असून ही सेवा सुरू झाल्यावर लॅपटॉपमधूनच टेक्स्ट मेसेज करता येणं शक्य होणार आहे.

माध्यमांतील रिपोर्ट्सनुसार, सॅमसंगने विंडोज 10 चा सपोर्ट असलेल्या काही कॉम्प्युटरवर या सेवेची चाचणी सुरू केली आहे. या सेवेसाठी सॅमसंग एक अ‍ॅप लाँच करेल. या अ‍ॅपद्वारे युजर आपला सॅमसंगचा स्मार्टफोन लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरशी कनेक्ट करु शकतात. ही सेवा वापरण्यासाठी लॅपटॉपमध्ये 5G किंवा 4G LTE कनेक्टिव्हिटी असणं आवश्यक आहे.

तर, माइक्रोसॉफ्ट स्टोअर लिस्टिंगनुसार, विंडोज 10 शिवाय सॅमसंगचं मेसेजिंग अ‍ॅप गॅलेक्सी टॅबप्रो एस, गॅलेक्सी बूक 10.6 LTE, गॅलेक्सी बूक 12 LTE, गॅलेक्सी बूक 2 आणि गॅलेक्सी फ्लेक्स2 5G वर काम करेल. पण ही सेवा अन्य कॉम्प्युटर्ससाठी लाँच होणार की नाही याबाबतही अजून नेमकी माहिती मिळालेली नाही.


ट्विटरवर युजरने शेअर केला स्क्रीनशॉट :-
सॅमसंगने आपल्या या नव्या सेवेची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. पण, माइक्रोसॉफ्ट स्टोअरच्या ‘Utilities & tools’ सेक्शनमध्ये हे अ‍ॅप बघण्यात आलंय. एका ट्विटर युजरने याचा फोटोही शेअर केला आहे. मात्र, हे अ‍ॅप नेमकं कसं काम करेल याबाबत सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही.