सॅमसंग ही कंपनी आपल्याला मोबाईलसाठी माहित आहे. पण याशिवायही सॅमसंगची अनेक इलेक्ट्रॉनिक उत्पादने आहेत. मूळ दक्षिण कोरीयाची असलेली ही कंपनी भारतीयांमध्ये लोकप्रिय असल्याचे नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणावरुन समोर आले आहे. टीआरए रिसर्च या संस्थेतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार भारतीय ग्राहक सॅमसंगला जास्त पसंती देत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे बाजारात मागील काही वर्षांपासून धुमाकूळ घालणारी रिलायन्सच्या जिओचा यामध्ये चौथा क्रमांक लागला आहे. सॅमसंगचे सध्या बाजारात ८ हजारांपासून ते ७५ हजारांपर्यंत अशा मोठ्या रेंजचे मोबाईल फोन उपलब्ध आहेत. विविध फिचर्स असलेल्या या स्मार्टफोन्सला ग्राहक पसंती देत आहेत.

भारतीय बाजारात प्रवेश करुन आणि आपले स्थान टिकवूनही कंपनीला बरेच वर्ष झाली आहेत. त्यामुळे कंपनीने ग्राहकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण केली असल्याने कंपनीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या सर्वेक्षणासाठी देशातील १६ शहरांचा अभ्यास करण्यात आला. त्यामधील ग्राहकांना त्यांचे पसंतीक्रम विचारण्यात आले होते. त्यावेळी यामध्ये अग्रस्थानी सॅमसंगचा नंबर लागला. सॅमसंगनंतर या यादीत टाटा मोटर्स दुसऱ्या क्रमांकावर तर अॅपल तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे आकडेवारीवरुन दिसून आले आहे. तर जिओनंतर मारुती सुझुकी पाचव्या स्थानावर असल्याचे दिसून आले आहे.