अनेकदा दुचाकी चालवताना आपण खूप काळजी घेत असतो. वेगावर नियंत्रण, चौकस लक्ष आणि वाहतुकीचे नियम पालन करून गाडी चालवत असतो. मात्र एवढे करूनही अपघात हा होतोच. चूक नसतानाही असे प्रसंग आपल्यासमोर येतात. देशभरात दररोज शेकडो अपघात होत असतात. मात्र आता हे अपघात टाळण्यासाठी व जाणारे जीव वाचवण्यासाठी ऑस्ट्रियाच्या स्टार्टअप कंपनी मोटरबीटने अपघातापासून सरंक्षण देणारे एक खास डिवाइस तयार केले आहे. हे डिवाइस दुचाकीस्वारासोबत समन्वय साधेल. याला ‘सेंटिनेल’ असे नाव देण्यात आले आहे. अपघात टाळणारे हे खास डिवाइस ‘क्राउडफंडिंग’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याची किंमत १२८ डॉलर म्हणजे भारतीय चलनात ९,५०० हजार रुपयात बुक केले जाऊ शकते.

हे डिवाइस आपल्या स्मार्टफोनशी ब्ल्यूटुथद्वारे जोडले जाऊ शकते. हाताला बांधता येणारे हे डिवाइस चालकाला ऑडिओ अथवा व्हिज्युअल सूचना देण्याऐवजी थेट संवाद साधते. अर्थात तसा पर्याय यात आहे. वाहन चालवताना हे डिवाइस चालकाला सतर्क ठेवण्यास मदत करते. इतकेच नाही तर ‘सेंटिनेल’ डिवाइस चालकाच्या वागणुकीचे विश्लेषण करते. तसेच अपघात झाल्यास हे डिवाइस तात्काळ संदेश पाठवून घटनेविषयी इतरांना सतर्क करते. २०२२ मध्ये हे डिवाइस भारतात उपलब्ध होईल असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.