झोपेचं गणित बिघडलं की सगळा दिवसच वाईट जातो आणि मग जोपर्यंत ही झोप होत नाही तोपर्यंत आपली गाडी काही रुळावर येत नाही. वेळच्या वेळी झोपलेलं केव्हाही चांगलं असं आपण दिवसातून कितीही वेळा ऐकलं तरीही प्रत्यक्ष झोपायची वेळ येते तेव्हा घड्याळात रात्रीचे बारा नक्कीच वाजून गेलेले असतात. आता दिवसभराची कामं, ऑफीस आणि इतर गोष्टी सांभाळताना नाकात दम येतोच त्यामुळे शेवटी सगळ्या गोष्टी शेवटी येतात त्या झोपेवरच. योग्य आहार, पुरेशी झोप, व्यायाम या आरोग्य चांगले राहण्यासाठी किमान गोष्टी असतात मात्र सध्या धकाधकीच्या जीवनात याच गोष्टी मिळणे अवघड झाल्येने आरोग्याचे तीनतेरा वाजायला वेळ लागत नाही. मग डॉक्टरांच्या वाऱ्या आणि औषधे यांचा मारा करुन कशीबशी तब्येत सावरलीही जाते मात्र पुन्हा काही दिवसांत हीच परिस्थिती उद्भवते. पण शेड्यूल इतके टाईट आहे की झोपेची वेळ वाढवू शकत नाही अशावेळी पुरेशी झोप घ्यायची असल्यास काही गोष्टी पाळणे आवश्यक आहे. काय आहेत या गोष्टी पाहूया…

१. झोपताना केसाला आणि अंगाला विशेषतः तळपायांना तेलाने मसाज करावा. हे तेल सुवासिक असल्यास अधिक चांगले.

२. झोपायच्या आधी स्मार्टफोनवर चॅटींग, टीव्ही पाहणे, फोनवर गप्पा मारणे, लॅपटॉपवर काही काम करणे यामुळे झोप येत नाही. किंवा आली असेल तरीही ती जाण्याची शक्यता असते.

३. जेवण झाल्याझाल्या झोपाला गेलात तर झोप येत नाही. त्यामुळे जेवणानंतर किमान १ तास इतर काही गोष्टी करणे आवश्यक आहे. यामध्ये शतपावली केल्यास उत्तम.

४. दिवसभर बैठे काम असणाऱ्यांना लवकर झोप येत नाही. त्यामुळे दिवसातील काही वेळ ठराविक काम किंवा शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. त्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते.

५. रात्री वेळेत झोप येत नसेल तर कोमट पाण्याने आंघोळ केल्यास चांगली झोप लागते. त्यामुळे हा प्रयोग करुन पाहण्यास हरकत नाही.

६. सुटीच्या दिवशी किंवा एरवीही दुपारी किंवा रात्री झोपून राहणे चांगले नाही. त्यामुळे रात्रीची नियमित झोप व्यवस्थित होत नाही. त्यामुळे पुढच्या सगळ्या गोष्टींत अडचणी येतात.

७. झोपेसाठी मानसिक शांतता असणे अत्यावश्यक असते. त्यामुळे झोपताना कोणत्याही गंभीर विषयाचा विचार करु नये. असा विचार येत असेल तर श्वासावर लक्ष केंद्रित करावे किंवा कोणताही जप करावा.