आहारातील कोकोचा अर्क समाविष्ट असलेल्या चॉकलेटच्या सेवनामुळे मेंदुच्या कार्याला बळ मिळत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. तसेच वयपरत्वे माणसांच्या स्मरणशक्तीशी निगडीत निर्माण होणाऱया अलझायमर टाळण्यासाठी चॉकलेट उपयोगी असल्याचेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सत्तरी ओलांडलेल्या लोकांना अलझायमर झाल्‍याचे आजवर आढळून आले आहे.
मेंदुच्या कार्यातील सातत्य राखणे आणि बळ निर्माण करून देण्यात चॉकलेटमधील कोको सहाय्यकारक असल्याचे वैज्ञानिक पुराव्यांनुसार सिद्ध झाल्याचे शास्त्रज्ञांनी नमूद केले. चॉकलेटमध्ये अलझमायझरला प्रतिबंध करणारे पोषक घटक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे चॉकलेटसेवनाची फायदेशीर बाजू देखील समोर आली आहे.
दरम्यान, संपूर्ण जगभरात सध्या जवळपास ४४ दशलक्ष लोक स्मृतिभ्रंश आजाराचे रुग्ण आहेत. यामध्ये अलझमायझर आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. अलझायमर झालेल्‍या व्‍यक्‍तीचा स्मृतीभ्रंश होतो हे आजवरच्‍या उदाहरणावरून सिद्ध झाले आहे. या आजाराला वैद्यकीय भाषेत डेमेन्शिया म्‍हटले जाते.