सापाच्या विषातील एक घटक हा हृदयाच्या संधिवाताची तीव्रता कमी करतो, असे एका संशोधनात दिसून आले आहे. बेलोर कॉलेज ऑफ मेडिसन या संस्थेच्या वैज्ञानिकांनी याबाबत संशोधन केले असून सापाच्या विषापासून तयार केलेल्या औषधाने कालांतराने १३ लाख संधिवातग्रस्तांना दिलासा मिळेल, असा दावा करण्यात आला आहे. डॉ. ख्रिस्तिन बीटॉन यांनी सांगितले की, सापाच्या विषात शेकडो संयुगे असतात व त्यातील एका संयुगाने हृदयाच्या संधिवाताची तीव्रता कमी होते असे दिसून आले आहे. त्यात कुठलेही वाईट परिणाम होत नाहीत. हृदयाच्या संधिवातात मानवी प्रतिकारशक्ती प्रणाली ही स्वशरीरावर हल्ला करते, यात फायब्रोब्लास्ट नावाच्या पेशी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. कारण या पेशी वाढून त्या सांध्यातून फिरत जातात, त्यातून स्रवणाऱ्या पदार्थाने सांधे खराब होतात. त्यामुळे प्रतिकारशक्ती प्रणालीतील पेशी तेथे येतात. त्यामुळे जास्त वेदना सुरू होतात. नंतर सांधे हलेनासे होतात. सध्या जे उपचार आहेत त्यात या पेशींवर भर दिलेला नाही, फायब्रोब्लास्ट पेशींना रोखणारे संयुग आम्ही शोधले आहे, असा दावा श्रीमती बीटन यांनी केला आहे. सापाच्या विषातील घटकात बुथुस टॅमलस नावाचे संयुग असते, जे फायब्रोब्लास्ट पेशींच्या पोटॅशियम मार्गिका रोखते. निरोगी पेशींच्या मार्गिका मात्र रोखल्या जात नाहीत, त्यामुळे या संयुगाचे वाईट परिणाम नाहीत. सापाच्या विषातील इबेरीओटॉक्सिनचे चांगले परिणाम उंदरावरील प्रयोगात दिसून आले आहेत. ‘दी जर्नल ऑफ फार्माकॉलॉजी अ‍ॅण्ड एक्सपिरिमेंटल थेरप्टिक्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.