सगळ्यांचे मोबाइल क्रमांक आता 10 ऐवजी 13 अंकांचे होणार या वृत्तानं अनेकांची झोप उडाली आहे. परंतु घाबरू नका, हे वृत्त अर्धवट आहे. फक्त M2M किंवा मशिन टू मशिन या अंतर्गत येणाऱ्या उपकरणांमध्ये जी सिम कार्ड वापरली जातात, म्हणजे स्वाइप मशिन्स, कार्स, इलेक्ट्रिक मीटर्स आदींमध्ये वापरण्यात येणाऱ्या सिम कार्डचे नंबर 13 डिजिटचे असतील. त्यामुळे आपल्या सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाइल क्रमांक आहेत तसेच म्हणजे 10 डिजिटचेच राहणार आहेत.

१० डिजिटचे मोबाईल क्रमांक आता १३ डिजिट होणार असल्याचे नुकतेच केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडून सांगण्यात आले. १ जुलैपासून हा नवीन बदल लागू होणार असून सर्व ग्राहकांचा क्रमांक आता १३ आकडी असेल, अशा बातम्या आल्या. मात्र हा बदल केवळ एम टू एम ग्राहकांसाठी आहे ही बाब अनेकांच्या लक्षात आली नाही आणि गोंधळ उडाला. एम टू एम चे मोबाइल क्रमांक 10 अंकांहून बदलून 13 अंकी करण्याचे काम 1 ऑक्टोबर रोजी सुरू होईल आणि 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आले आहे. तर 1 जुलै पासून दिले जाणारे एम टू एम क्रमांक 13 अंकी असतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

या नव्या निर्णयामुळं जगभरात मोबाईल क्रमांक सर्वात मोठा असणारा देश हा भारत असेल. सध्या चीनमध्ये ११ डिजिटचे मोबाईल क्रमांक असतात. यामध्ये देशाचा कोड नंबर आणखी वेगळा असतो. या खेरीज फ्रान्समध्येही काही प्रदेशांमध्ये 10 पेक्षा जास्त डिजिटचे मोबाइल क्रमांक आहेत.

M2M दूरसंचार सेवा म्हणजे काय?

वायरलेस उपकरणांना या तंत्रज्ञानामुळे एकमेकांशी माहितीची देवाणघेवाण करता येते. यामध्ये, स्वाइप कार्ड्स, स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर्स, वेहिकल ट्रॅकिंग सिस्टिम, फ्युएल मॉनिटक सिस्टिम आदी यंत्रणांचा समावेश आहे. या यंत्रणा आपण जसे मोबाइलवर डेटा घेतो किंवा पाठवतो त्याचप्रमाणे सिमकार्डच्या माध्यमातून डेटाचं चलनवलन करतात. त्यांच्यासाठी लागणारं दूरसंचार तंत्रज्ञान मोबाइलसाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाप्रमाणेच असतं, त्यामुळेच मोबाइलसारखंच सिम कार्ड लागतं आणि मोबाइलसारखा क्रमांकही सोबत येतोच. फक्त प्रचंड संख्येनं वाढलेले मोबाइल आणि क्रमांकांवर असलेली मर्यादा लक्षात घेऊन M2M साठी 13 अंकी क्रमांक देण्याचा निर्णय झाला आहे, जेणेकरून आपण वापरत असलेल्या मोबाइल क्रमांकासाठी 10 आकडी क्रमांकाची कमतरता भासणार नाही.