शाकाहारच लाभदायी
प्रक्रिया केलेले लाल मांस रोज खाण्याने मृत्यूची शक्यता अधिक असते असे १५ लाख लोकांच्या अभ्यासावरून दिसून आले आहे. अमेरिकेतील मेयो क्लिनिकच्या संशोधकांनी सहा अभ्यास निष्कर्षांचे मूल्यमापन केले असता त्यांना मांसाहारी लोकांमध्ये शाकाहारी लोकांपेक्षा मृत्यूचे प्रमाण अधिक दिसून आले. तुमचे अन्न तुमच्या प्रकृतीला होणाऱ्या हानी व लाभावर परिणाम करीत असते, हेच यातून दिसून आले आहे असे न्यूयॉर्क इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे ब्रुकशील्ड लॉरेन्ट यांनी म्हटले आहे. अमेरिका व युरोपमधील लोकांच्या माहितीच्या आधारे जे निष्कर्ष काढण्यात आले आहेत त्यानुसार जे लोक प्रक्रिया केलेले लाल मांस खातात त्यांच्यात मृत्युदर जास्त असतो. २०१४ च्या अभ्यासानुसार ५.५ ते २८ वयोगटात १० लाख लोकांचा विचार करण्यात आला त्यात हॉट डॉग, हॅम, बेकन, सॉसेज, सलामी या पदार्थाचा वापर काही लोक करीत होते. तर काही जण मीठ न घातलेले बीफ, पोर्क, लॅम्प व गेम हे पदार्थ खात होते. ते प्रक्रिया न केलेले पदार्थ होते. या लोकांमध्ये हृदयविकार व इतर रोग दिसून आले. १५ लाख लोकांमध्ये ज्यांनी प्रक्रिया केलेले मांस सेवन केले त्यांच्यात मृत्युदर जास्त दिसून आला. २००३ मधील आकडेवारी पाहिली असता पाच लाख सहभागी लोकांमध्ये जास्त मांस सेवन करणाऱ्यांच्या तुलनेत कमी मांस सेवन करणाऱ्यांमध्ये मृत्यूची जोखीम सर्व रोगांचा विचार करता २५ ते ५० टक्के कमी झाली. सतरा वर्षे जे लोक शाकाहारी भोजन घेत होते, त्यांचे आयुर्मान कमी काळ शाकाहारी राहिलेल्यांपेक्षा ३.६ वर्षांनी वाढलेले दिसले. प्राण्यांचे मांस कमी खाऊन जास्तीतजास्त वनस्पतीजन्य अन्नपदार्थ सेवन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी या संशोधनामुळे दिला आहे. जर्नल ऑफ द अमेरिकन ऑस्टिओपॅथिक असोसिएशन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.