-डॉ. तुषार पारेख

उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा परिणाम लहान-थोरांपासून प्रत्येकावर होत असतो. मात्र या काळात लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते. अतिउष्णता, घामोळं यामुळे लहान बाळांची चिडचिड होते. ते सतत रडतात, तसंच त्यांना त्रासही होता. त्यामुळे वातावरणातील उष्णता वाढल्यानंतर मुलांच्या शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवण्याची गरज असते. लहान मुलांची त्वचा संवेदनशील असल्यामुळे प्रखर सूर्यप्रकाशामुळे आणि उष्णतेमुळे त्याचा परिणाम थेट मुलांच्या त्वचेवर होत असतो. अशा वेळी उष्णतेपासून त्यांच्या नाजूक त्वचेचा रक्षण कसे करता येईल हे पाहूया.

१.सुती कपडे घाला –
आपल्या बाळाला शक्यतो सुती कपडेच घाला. तसंच हे कपडे अतिशय आरामदायी असावेत. म्हणजे ते घट्ट नसावेत. सिंथेटिक कापड वापरलं तर त्यामुळे मुलांच्या अंगात उष्णता टिकून राहते. त्यामुळे त्यांच्या अंगावर घामोळं येऊ शकतं.साबणाचा अतिवापर करू नका. त्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. उन्हाळ्यात डायपरचा वापर कमीच करावा. या डायपरमुळे घाम त्वचेवरच राहतो. त्वचा सतत ओलसर राहिल्यामुळे त्वचेवर पुरळ येणे किंवा ती लाल होणे असे विकार होऊ शकतात. म्हणून या दिवसांत डायपरचा वापर कमीच करा. त्याऐवजी कापडाचा वापर करावा. कपडयामुळे त्वचा कोरडी राहते.

२. खोलीचे तापमान योग्य ठेवा –
घरातील लहान मुलांना शांत वातावरणात झोपू द्या आणि त्यांची खोली पुरेशी थंड असेल याची काळजी घ्या. तीव्र सुर्यप्रकाश खोलीत येणार नाही याकरिता गडद पदड्यांचा वापर. घरात प्रकाशासाठी मंद दिव्यांचा वापर करावा. लहान मुलांना शक्यतो उन्हापासून दूर ठेवा.

३. मुलांचा हायड्रेटेड ठेवा –
उन्हाळ्यात मुलांना डिहायड्रेशनचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत असतो. जर तुम्ही बाळाला स्तनपान करीत असाल, तर त्याला वेळेवर दूध दिल्याने बाळ हायड्रेड राहण्यास मदत होईल; पण जर तुम्ही बाळाला बाहेरचे अन्न देत असाल, तर लक्षात ठेवा उन्हाळ्यामध्ये तुमच्या बाळाची भूक कमी होत असते. यासाठी त्याला फळांचा रस, ताक,नारळाचे पाणी, लिंबू पाणी, पुदिना घातलेले पाणी, ग्लुकोज असे द्रवपदार्थ द्या. बाळाला ताप असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपल्या मर्जीने औषध देऊ नका.

४. लहान मुलांसाठी आहार –
आपण त्यांना खरबूज, बेरी, हिरव्या पालेभाज्या किंवा सूप देऊ शकता. त्यांना एकाच वेळी भरपेट जेवण न देता थोड्या थोड्या अंतराने खाऊ घाला. त्यांच्या आहारात सर्व आवश्यक पौष्टिक पदार्थांचा समावेश असेल याची खात्री करा. मसालेदार किंवा तेलकट पदार्थ देण्याचे टाळा. मुलांना वारंवार पाणी पाजा. लहान मुले विशेषत: खेळात मग्न असल्याने पाणी प्यायला विसरतात अशा वेळी दर दोन तासांनी त्यांना पाणी पाजा.

५. मुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष पुरवा –
आपल्या लहान मुलाला कारमध्ये एकटं सोडू नका, जर कार उन्हात असेल आणि खिडक्या बंद असतील तर आतील तापमान अधिक वाढते अशा वेळी मुलांना एकटं सोडून खरेदीसाठी जाणे टाळा. उन्हात उभ्या केलेल्या लॉक कारच्या आत मुलांना एकटे सोडल्यामुळे उष्माघात आणि अगदी मृत्यूच्या घटना देखील घडतात. आपण कार चालविताना एसी वापरा जेणेकरून कारमध्ये योग्य तापमान राखता येईल.

( लेखक डॉ. तुषार पारेख हे पुण्यातील मदरहुड हॉस्पिटलमध्ये कन्‍सल्‍टंट निओनॅटोलॉजिस्ट आणि बालरोग तज्ज्ञ आहेत. )