17 July 2019

News Flash

भाज्या धुताना ही काळजी घ्यायला हवी

जळगावमध्ये कच्ची मेथी खाल्ल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

मेथीची भाजी खाल्ल्याने जळगावमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या महिलेने खाल्लेल्या मेथीवर किटकनाशके फवारली होती. त्यामुळेच विषबाधा होऊन तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालामध्ये समोर आले आहे. या प्रकरणामुळे फळभाज्यांवर फवारल्या जाणाऱ्या किटकनाशकांमुळे होणाऱ्या विषबाधेचा मुद्दा नव्याने चर्चेत आला आहे. याआधीही पुण्यात भोपळ्याचा रस प्यायल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. फळे किंवा भाज्यांवर ते टीकण्यासाठी किंवा कीड लागू नये म्हणून कीटकनाशके फवारली जातात. मात्र या कीटकनाशकांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे आपण पाहतो. हे परिणाम काही वेळा इतके गंभीर असतात की त्यामुळे व्यक्तीचा जीवही जाण्याची शक्यता असते. त्यामुळे भाज्या करताना त्या योग्य पद्धतीने धुवायला हव्यात. पाहूयात भाज्या धुताना कोणती काळजी घ्यावी…

१. फळे आणि भाज्या वाहत्या नळाच्या पाण्याखाली धुतल्याने त्यांच्यावरील कीटकनाशके संपूर्णपणे निघून जात नसली, तरी काही प्रमाणात हटविली जाऊ शकतात.

२. वाहत्या पाण्याखाली फळे किंवा भाज्या हाताने चोळून किंवा एखाद्या नरम ब्रशने धुणे आवश्यक आहे.

३. मोठ्या भांड्यामध्ये पाणी आणि व्हिनेगर एकत्र करावे. तीन भाग पाणी असल्यास एक भाग व्हिनेगर घ्यावे. ह्या मिश्रणामध्ये भाज्या आणि फळे थोडा वेळ बुडवून ठेवावीत.

४. भाजी धुण्यासाठी मीठ आणि हळदीचा वापरही अतिशय उपयुक्त ठरतो. त्यामुळे भाजीवर लहानशी कीड असेल किंवा किटकनाशके असतील तर ती निघून जाण्यास मदत होते.

५. पालेभाज्या किंवा काही फळभाज्या धुण्याआधी त्या काही काळ साध्या पाण्यात भिजवून ठेवाव्यात. त्यामुळे त्यावरील रसायने निघून जाण्यास मदत होते.

First Published on December 7, 2018 11:43 am

Web Title: take care while washing vegetables and fruits easy and important tips