‘डोळे’ हा शरीरातील सर्वात नाजूर अवयव मानला जातो. त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. डोळे आपल्या व्यक्तिमत्वाचे प्रतिनिधीत्व करत असून बोलके डोळे व्यक्तीमत्वामध्ये बदल घडवून आणत असतात. त्यामुळे ते अधिक उठावदार, आकर्षक दिसण्यासाठी त्यांच्यावर आय मेकअपच्या नावाखाली प्रसाधनांचा भडीमार करण्यात येतो. प्रसाधनांमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल्सचा वापर केल्यामुळे डोळ्यांना इजा पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे झोपण्यापूर्वी कायम डोळ्यांवरील मेकअप काढणे गरजेचे आहे. परंतु, अनेकवेळा याकडे दुर्लक्ष केल्यामुळे डोळ्यांवर विपरीत परिणाम होतात. त्यातीलच काही विपरीत परिणाम अविनव वर्मा यांनी सांगितले आहेत.

१. डोळ्यांची जळजळ – डोळे हा सर्वात नाजूक अवयव असल्यामुळे त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. डोळ्यांकडे जरासे दुर्लक्ष झाल्यास मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. आयमेकअपसाठी लागणा-या उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर रसायनांचा वापर केलेला असतो. त्याचा परिणाम थेट आपल्या डोळ्यांवर होत असतो. त्यामुळे डोळ्यांवर केलेला मेकअप वेळेवर न काढल्यास डोळ्यांची जळजळ होण्यास सुरुवात होते. यामध्ये अनेक वेळा डोळे लालदेखील होत असतात.

२. डोळ्यांच्या कडांना इजा पोहोचणे- मस्करा किंवा लायनर यांच्या वापरामुळे डोळे मोठे आणि उठावदार दिसतात. त्यामुळे लायनर आणि मस्करा यांचा सर्रास वापर केला जातो. मात्र झोपण्यापूर्वी डोळ्यांवरुन हे दोन्ही घटक न काढल्यास डोळ्यांच्या कडांना इजा पोहोचण्याची शक्यता असते. त्याचबरोबर पापण्यांवर असलेले हेअर फॉलिकक्स बंद होण्याची शक्यता असते. हे हेअर फॉलिकल्स बंद झाल्यास डोळ्यांवर त्याचा विपरित परिणाम होते.

३. पापण्या गळणे- पापण्या ह्या जितक्या सुंदर असतात. तितक्याच त्या नाजूकही असतात. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. पापण्यांवर सतत प्रसाधनांचा मारा होत राहिल्यास पापण्या कमजोर होऊन त्या तुटण्याची शक्यता अधिक असते. परिणामी पापण्या गळू लागतात.  पापण्या विरळ झाल्यामुळे डोळ्यांचे सौंदर्य कमी होऊ शकते. त्यांमुळे कायम झोपण्यापूर्वी डोळ्यांवरील मेकअप उतरविणे गरजेचे आहे.

४. डोळ्यांभोवती काळी वर्तुळे- डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येण्याची समस्या अनेकदा पहायला मिळते. मात्र ही वर्तुळे अनेक कारणांमुळे येऊ शकतात. त्यातलंच एक कारण म्हणजे डोळ्यांवरील मेकअप न काढणे. मस्करा,लायनर, आयशेड्स यामध्ये केमिकलचा समावेश असतो. ही प्रसाधने डोळ्यांवर ठेऊन तसेच झोपल्यास डोळ्यांना इजा होते. रात्रभर ही रसायने डोळ्यांभोवताच्या भागांमध्ये पसरत असतात. त्याचाच परिणाम डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होतात.

५. डोळ्यांमध्ये संसर्ग होणे – प्रसाधनांमध्ये रसायनांचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्याचा थेट परिणाम त्वचेवर होत असतो. त्यातच डोळे हा नाजूक भाग असल्यामुळे त्याच्यावर विपरित परिणाम होण्यास फार काळ लागत नाही. या आयमेकअपमुळे डोळ्यांमध्ये इंफेक्शन होण्याची शक्यता असते. अनेक वेळा डोळ्यातील बुबुळांवरही त्यांचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे झोपण्यापूर्वी कायम डोळ्यांवरील मेकअप उतरवून डोळे स्वच्छ करुन झोपणे गरजेचे आहे.