भारतात व्हॉट्स अॅप वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मेसेजसोबत व्हिडिओ, वॉइस कॉलिंग, फोटो, फाईल्स ट्रान्सफरची सुविधा या अॅपमध्ये आहे. त्यामुळे एकापेक्षा अधिक सुविधा पुरवणाऱ्या या अॅपचा वापर भारतात सर्वाधिक होत असल्यास नवल वाटायला नको. मात्र जर तुमचा फोन चोरीला गेला तर त्यातील व्हॉट्स अॅप कसे सुरक्षित ठेवावं यासाठी काही सोप्या टिप्स.

– फोन चोरीला गेल्यानंतर सर्वात आधी तुम्ही तुमचं सिम कार्ड लॉक करा. असं केल्यामुळे व्हेरिफिकेशन मेसेज आल्याशिवाय तुमचं व्हॉट्स अॅप सुरु होणार नाही.

– दुसरा पर्याय म्हणजे त्याच मोबाईल क्रमांकाचं नवीन सिम कार्ड घेऊन तुम्ही व्हॉट्स अॅप अॅक्टिव्हेट करू शकता. फेसबुक किंवा अन्य सोशल मीडिया सारखं हे अॅप वेगवेगळ्या डिव्हाइसवर सुरू करता येत नाही. त्यामुळे व्हेरिफिकेशन कोड आल्यानंतर तुम्ही नवीन मोबाईलमध्ये व्हॉट्स अॅप सुरू करू शकता.

– फोन चोरीला गेल्यानंतर तुम्ही support@whatsapp.com या मेल आयडीवर व्हॉट्स अॅप अकाऊंटवर बंद करण्यासाठी मेसेज करु शकता. “Lost/Stolen: Please deactivate my account” असा मेसेज करून तुम्हाला व्हॉट्स अॅप अकाऊंट डिअॅक्टिव्हेट करता येऊ शकतं.

– जर तुम्हाला कोणी मेसेज पाठवले असतील तर ३० दिवसांच्या कालावधीपर्यंत हे मेसेज व्हॉट्स अॅप अकाऊंटमध्ये राहतात.

– तुम्ही ३० दिवसांच्या आत तुमचं व्हॉट्स अॅप अकाऊंट दुसऱ्या डिव्हाइसमध्ये सुरू केलं तर तुम्हाला ते मेसेज परत मिळू शकतात.

– मात्र तुम्ही ३० दिवस होऊनही तुमचं व्हॉट्स अॅप अकाऊंट अॅक्टिव्हेट केलं नसेल तर मात्र तुमचं व्हॉट्स अॅप अकाऊंट कायमस्वरूपी डीलीट होऊ शकतं.