अशा फार कमी व्यक्ती असतील आज ज्यांच्या हाती मोबाईल नसेल. परंतु तुमच्या मोबाईल क्रमांकामध्ये लवकर मोठा बदल होण्याची शक्यता आहे, तुमचा मोबाईल क्रमांक १० डिजिटवरून ११ डि़जिटचा होण्याची शक्यता आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (ट्राय) यासंबंधीत एक प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाद्वारे सर्वांचे मोबाईल क्रमांक ११ डिजिटचे करण्यात यावेत, असं सुचवण्यात आलं आहे. १० ऐवजी ११ डिजिटचे क्रमांक केल्यास देशात अधिक मोबाईल क्रमांक उपलब्ध होतील, असं ट्रायनं म्हटलं आहे.

जर मोबाईल क्रमांकाच्या सुरूवातीचा क्रमांक ९ हा ठेवण्यात आला तर १० वरून ११ डिजिटवर स्विच झाल्यानंतर देशातील मोबाईल क्रमांकाची क्षमता १० अब्ज होईल, असं ट्रायनं प्रस्तावात म्हटलं आहे. तसंच ७० टक्के वापर आणि विद्यमान धोरणांनुसार ७०० कोटी कनेक्शन होईपर्यंत ते सुरू ठेवता येऊ शकतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

लँडलाईनवरून कॉल करण्यापूर्वी ‘०’ डायल करा

याव्यतिरिक्त लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करण्यापूर्वी मोबाईलच्या क्रमांकाच्या आधी शून्य डायल करण्याचा प्रस्तावही ट्रायनं दिला आहे. सद्यस्थितीत इंटर सर्व्हिस एरिया मोबाईल कॉल्ससाठी मोबाईल क्रमांकापूर्वी शून्य डायल करावा लागतो. परंतु मोबाईल क्रमांकाच्या सुरूवातीला शून्य न लावताही कॉल करणं शक्य आहे. फिक्स्ड नेटवर्कवरून मोबाईल क्रमांकापूर्वी शून्य डायल करून फोन केल्यास लेव्हल २,३,४ आणि ६ मध्ये फ्री सब लेव्हल्सला मोबाईल नंबरप्रमाणेच वापरता येऊ शकतं, असं ट्रायनं म्हटलं आहे.

येणार नवा नंबरिंग प्लॅन

याव्यतिरिक्त ट्रायनं नव्या नॅशनल नंबरिंग प्लॅनची सुचनाही केली आहे. तसंच हा लवकरात लवकर लागू करावा असंही म्हटलं आहे. याव्यतिरिक्त डाँगल्सद्वारे वापरात येणारे मोबाईल क्रमांक १० वरून १३ डिजिटचे करण्याचा प्रस्तावही ट्रायनं दिला आहे.