भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, व्हायबर (Viber) आणि गूगल यांसारख्या लोकप्रिय ‘ओव्हर द टॉप’ अर्थात ‘ओटीटी’ अ‍ॅप्ससाठी नियमावली बनवण्याची गरज नाकारली आहे. सर्व प्रकारच्या नियामकांसह येण्याची ही योग्य वेळ नसल्याचं ट्रायने सोमवारी(दि.14) म्हटलं आहे.

यासोबतच, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ओटीटी सेवांच्या गोपनीयतेशी संबंधित कोणत्याही नियामावलीची आवश्यकताही फेटाळून लावली आहे. ओटीटी अ‍ॅप्सवर नियंत्रणासाठी व्यापक नियमावली बनवण्याची ही योग्य वेळ नाहीये, असं ट्रायने सोमवारी म्हटलं. पण, “घडामोडींचे परीक्षण केले जाईल आणि आवश्यकतेनुसार योग्य वेळी हस्तक्षेप केला जाईल असंही ट्रायने स्पष्ट केलं आहे.

देशातील टेलिकॉम कंपन्या गेल्या काही वर्षांपासून ओटीटी अ‍ॅप्ससाठी नियमावली बनवण्याची मागणी ट्रायकडे करत आहेत. ओटीटी अ‍ॅप्स ग्राहकांकडून शुल्क न आकारता मोफत सेवा पुरवून आमचा महसूल कमी करत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी नियमावली बनवावी अशी टेलिक़म कंपन्यांची मागणी आहे. तर, आपण आधीपासून आयटी कायद्यांतर्गत नियमांचं पालन करतो असं म्हणत ओटीटी अ‍ॅप्स कंपन्यांनी नियमावलीला विरोध दर्शवला आहे.