स्मार्टफोन वापरणारे बरेचसे लोक ट्रू कॉलर या अॅप्लिकेशनचा वापर करतात. आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह नसलेल्या व्यक्तीचा आपल्याला फोन आला तर त्याचे नाव ओळखण्यासाठी या अॅपचा चांगला उपयोग होतो. आता हे अॅप्लिकेशन आणखी एक चांगली सुविधा देणार आहे. ‘ट्रू कॉलर’ने आपल्या युजर्ससाठी कॉल रेकॉर्डिंगची नवी सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे तुम्हाला येणारा कोणताही कॉल तुम्ही अगदी सहज रेकॉर्ड करु शकणार आहात. त्यामुळे ट्रू कॉलरचे हे अॅडव्हान्स फिचरचा आपल्याला निश्चितच चांगला फायदा होईल.
कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर या नवीन फीचरची माहिती दिलेय. ट्रू कॉलरच्या नव्या फिचरमुळं रेकॉर्ड केलेले कॉल आपल्या फोनमध्ये सेव्ह होणार आहेत. तर पहिल्या १४ दिवसांसाठी ग्राहकांना हे फीचर्स मोफत वापरता येईल. त्यानंतर मात्र या फीचर्ससाठी पैसे द्यावे लागणार आहेत. ही किंमत किती असेल याबाबत मात्र आता कंपनीने माहिती दिली नाही. आता आपल्याला फोनकॉल रेकॉर्ड करायचा असेल तर फोन सुरु असताना रेकॉर्डर ऑन करावा लागतो. मात्र आता तसे न करताही फोन कॉल रेकॉर्ड होऊ शकतो.
यामध्ये युजरच्या खासगीपणाबद्दल काय असा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असेल. तर खासगी गोष्टींमध्ये हस्तक्षेप होऊ नये म्हणून कंपनीकडून विशेष काळजी घेतली जाणार आहे. युजर्सने रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार आहेत. ट्रू कॉलरचं हे नवीन फिचर फक्त अँड्रॉइड ५.० आणि त्याच्या पुढील व्हर्जनमध्येच चालणार आहे. दरम्यान, अँड्रॉइड ७.१.१ नुगावर हे फिचर सुरु होणार नाही असं कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये नेक्सस, पिक्सल आणि मोटो G4 यांसारख्या मोबाईलचा समावेश आहे.