शारीरिक व्यायाम कमी करणे आणि बैठी जीवनशैली वाढल्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होत असून, टाइप २चा मुधमेह असणाऱ्यांवर याचा अधिक हानिकारक परिणाम होत असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे.

या अभ्यासामध्ये प्रामुख्याने शारीरिक व्यायाम वाढवण्यावर जोर देण्यात आला असून, बैठी जीवनशैली टाळण्यास सांगण्यात आले आहे.

यामध्ये जास्त वेळ बसून राहणे, टीव्ही पाहणे, संगणकावर खेळ खेळणे यासह इतर बैठे काम अधिक प्रमाणात करणे हे शरीरासाठी धोक्याचे असल्याचे ब्रिटनमधील लिव्हरपूल विद्यापीठाच्या केली बॉडेन यांनी म्हटले.

प्रत्येकाला व्यायाम करण्याचे फायदे माहिती आहेत. मात्र अधिक जण तो टाळण्याचा प्रयत्न करतात. अधिक बसून न राहता जास्तीत जास्त शरीर हलविण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

या अभ्यासामध्ये ४५ लोकांचा समावेश करण्यात आला होता. यापैकी १६ जणांना टाइप २ प्रकारचा मधुमेह होता. या सहभागींनी १४ दिवस शारीरिक व्यायाम कमी केला. यामुळे सर्व सहभागींच्या शरीरामध्ये फॅटची पातळी वाढलेली दिसून आली. तसेच त्यांचे शरीर संप्रेरकांना (हार्मोन) कमी प्रतिसाद देत असल्याचे यामध्ये आढळून आले. उदा. इन्सुलिन.

यावेळी अधिक अभ्यास केला असता ज्या सहभागींना टाइप २ प्रकारचा मधुमेह होता, त्यांच्या प्रमाणात इतर सहभागींच्या तुलनेत फॅटचे प्रमाण अधिक आढळून आले. जी अतिशय धोकादायक स्तरापर्यंत वाढलेली होती.

त्यानंतर सहभागींना पुन्हा १४ दिवस व्यायाम आणि इतर योग्य आहार करण्यास सांगण्यात आला. यावेळी अनेकांचे फॅट कमी झाल्याचे दिसून आहे.

यामुळे शारीरिक व्यायाम किती फायदेशीर आहे हे यातून दिसून आले.

टाइप २ प्रकारातील मधुमेह हा अतिशय वेगाने वाढत असून, यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. रक्तातील शरीरातील ग्लुकोजची पातळी अतिशय वेगाने वाढते.

ब्रिटनमध्ये ४.६ दशलक्षपेक्षा अधिक नागरिकांना मधुमेह असून, यातील ९० टक्के टाइप २ प्रकारचा मधुमेह आहे.

आरोग्यदायी जीनवशैली असणे सद्य:स्थितीमध्ये अतिशय आवश्यक असून, यामुळे अनेक आजार दूर होत असल्याचे दिसून येते. हा अभ्यास ब्रिटनच्या व्यावसायिक वार्षिक मधुमेह परिषदेमध्ये सादर करण्यात आला.