विश्वकर्मा पूजेचा सण आज म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जाईल. धार्मिक मान्यतेनुसार, विश्वकर्मा हे जगातील पहिले अभियंता होते. असं मानलं जातं कि, विश्वकर्मा पूजा केल्याने जीवनात कधीही सुख आणि समृद्धीची कमतरता भासत नाही. दरम्यान, आजच्याच दिवशी सूर्य कन्या राशीत प्रवेश करत आहे. म्हणूनच, आज कन्या संक्रांत देखील साजरी केली जाईल. यासोबतच आज वामन जयंती आणि परिवर्तनिनी एकादशी देखील आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भगवान विश्वकर्मा कोण आहेत?

धार्मिक मान्यतेनुसार, ब्रम्हदेवाने हे जग निर्माण केलं आणि त्याला सुंदर बनवण्याचं काम भगवान विश्वकर्मावर सोपवलं. म्हणूनच, विश्वकर्मा हे जगातील पहिले आणि महान अभियंता असल्याचं म्हटलं जातं. याचसोबत, असंही मानलं जातं की विश्वकर्मा हे ब्रह्मदेवाचे पुत्र असलेल्या वास्तूचे पुत्र होते. त्याचसोबत, रावणाची लंका, कृष्णाची द्वारका, पांडवांचं इंद्रप्रस्थ, इंद्राचं वज्र, महादेवाचं त्रिशूळ, विष्णूचं सुदर्शन चक्र आणि यमराजचं कालदंड यांसह अनेक गोष्टी भगवान विश्वकर्मांनी निर्माण केल्या असं देखील मानलं जातं.

विश्वकर्मा पूजेचं महत्त्व

असं म्हटलं जातं की, भगवान विश्वकर्मा यांची पूजा केल्याने व्यक्तीतील कला विकसित होते. ज्यामुळे त्या व्यक्तीला त्याच्या कामात यश मिळतं. आजच्या दिवशी भगवान विश्वकर्माच्या पूजेबरोबरच साधनं, यंत्र, वाहनं, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची देखील पूजा केली जाते. या दिवशी बरेच लोक त्यांच्या मशीन आणि यंत्रणाला थोडी विश्रांती देतात. त्यामुळे, सहसा या दिवशी अनेक कार्यालयं देखील बंद असतात. या सण विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि दिल्ली सारख्या काही राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

पूजा कशी करतात?

या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून विश्वकर्मा पूजेसाठी लागणारं साहित्य गोळा केलं जातं. ही पूजा पती -पत्नीने एकत्र करणं अधिक चांगलं असल्याचं मानलं जातं. यावेळी, पती -पत्नी हातात तांदूळ घेतात आणि भगवान विश्वकर्माला पांढरी फुलं अर्पण केली जातात. यज्ञ कुंडात धूप, दिवा आणि फुले अर्पण करून यज्ञ केला जातो. त्यानंतर, सर्व यंत्र आणि साधनांची पूजा करतात आणि भगवान विश्वकर्माला नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद वाटतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishwakarma puja 2021 importance of vishwakarma puja significance tools and machine worshipped gst
First published on: 17-09-2021 at 10:08 IST