मोबाईल कंपन्यांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरु आहे. रिलायन्स जिओ बाजारात दाखल झाल्यापासून कंपन्यांमधील ही स्पर्धा तीव्र झाल्याचे दिसते. जिओने मोफत इंटरनेट आणि कॉलिंग दिल्याने इतर कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे व्होडाफोन, एअरटेल, आयडीया आणि बीएसएनएलसारख्या कंपन्या आपले नवनवीन प्लॅन सातत्याने जाहीर करत आहेत. नुकताच व्होडाफोनने एक प्लॅन जाहीर केला आहे. याअंतर्गत व्होडाफोनच्या काही प्रीपेड रिचार्जवर १०० टक्के कॅशबॅक मिळू शकणार आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या ऑफर्स जाहीर करण्यात येतात.

यामध्ये ग्राहकांना ५० रुपयांचे कूपन मिळणार असून त्याचा उपयोग ग्राहकांना पुढील रिचार्जसाठी होणार आहे. ही ऑफर कंपनीच्या ३९९, ४५८ आणि ५०९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर लागू होणार आहे. हे रिचार्ज केल्यावर ग्राहकांच्या अकाऊंटवर ५० रुपयांचे कॅशबॅक कूपन जमा होणार आहेत. माय व्होडाफोन अॅपच्या माध्यमातून ग्राहक त्याचा वापर करु शकतात. काही दिवसांपूर्वीच रिलायन्स आणि एयरटेलने अशाचप्रकारे कॅशबॅक ऑफर जाहीर केली होती. त्याला टक्कर देण्यासाठी आता व्होडाफोनने आपली ऑफर जाहीर केली आहे. रिलायन्स मागच्या बराच काळापासून १०० टक्के कॅशबॅक ऑफर देत आहे. तर एअरटेलनेही ३९९ रुपयांच्या रिचार्जवर ही ऑफर दिली होती.

३९९ रुपयांचे रिचार्ज करणाऱ्यांना ५० रुपयांची ८ कूपन मिळतील. ४५८ रुपयांच्या रिचार्जसाठी ९ कूपन मिळतील तर ५०९ रुपयांच्या रिचार्जसाठी १० व्हाऊचर मिळतील असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. काही सर्कलमध्ये व्होडाफोन १९९ रुपयांच्या रिचार्जवरही १०० टक्के कॅशबॅक देत आहे. ३९९, ४६८ आणि ५०९ या तिन्ही रिचार्जवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १.४ जीबी इंटरनेट डेटा आणि रोज १०० मेसेज या सुविधा मिळतात. तर या तिन्हीची व्हॅलिडीटी अनुक्रमे ७०, ८० आणि ९० दिवस आहे. त्यामुळे ग्राहकांना हे रिचार्ज पूर्णपणे मोफत मिळणार आहे.