क्रेडिट रिपोर्ट तपासल्याने तुम्हाला तुमच्या आर्थिक स्वास्थ्याची चांगली माहिती मिळू शकते. सर्व वित्तीय संस्था असेच करतात. प्रत्येक वित्तीय संस्था कोणालाही कर्ज देण्याआधी त्यांची ऋण-पात्रता ठरवण्यासाठी त्यांचा क्रेडिट स्कोअर पाहते. तुमच्या क्रेडिट स्कोअर वरून तुमचा क्रेडिट इतिहास आणि कर्जाच्या परतफेडीची पद्धत कळते आणि याबाबत माहिती क्रेडिट ब्यूरोला तुम्हाला कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था पुरवतात. तुमचा क्रेडिट स्कोअर व्यवस्थित आहे किंवा नाही, तसेच वित्तीय संस्थांनी क्रेडिट रेटिंग ब्यूरोला पुरवलेली माहिती अचूक आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी वेळोवेळी क्रेडिट रिपोर्ट तपासून पाहाणे महत्वाचे आहे. आज पाहूया तुमच्या क्रेडिट रिपोर्टमधील महत्वाची माहिती कुठली असते आणि ती कशा पद्धतीने तपासायला हवी.
वैयक्तिक माहिती
क्रेडिट रिपोर्टमध्ये तुमचे नाव, लिंग, जन्म तारीख, ईमेल पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक, पत्ता आणि पॅन क्रमांक अशासारखी वैयक्तिक माहिती असते. ही माहिती रिपोर्टमध्ये अचूक आहे याची खात्री करा. जर हा तपशील चुकीचा असेल, तर अनेक समस्या उद्भवू शकतात. याचा अर्थ तुमची वैयक्तिक माहिती इतर कोणी वापरत आहे (ओळख-चोरी) किंवा इतर कोणाची माहिती तुमच्या रिपोर्टमध्ये आलेली आहे. असे लक्षात आल्यास तुमच्या वित्तीय संस्थेशी संपर्क साधून ही माहिती तुम्ही सुधारून घेतली पाहिजे.
खात्यांचा तपशील
क्रेडिट रिपोर्टमध्ये तुमची सध्याची आणि जुनी सर्व कर्ज खाती वित्तीय संस्थेच्या तपशिलासकट असतात. खाते क्रमांक, कर्जाचा आकडा, कर्जाचा प्रकार, त्या तारखेला उर्वरित कर्जाची रक्कम, कर्ज देण्याची तारीख, व्याजाचा दर, गेल्या ३६ महिन्यांचा परतफेडीचा अहवाल, जामीन (असल्यास) ठेवल्याचा तपशील, परतफेडीला उशीर झाला असेल तर त्याची माहिती, जुने कर्ज पूर्ण केल्याचा तपशील आणि परतफेड नाही केल्याचा तपशील इत्यादी माहिती असते.
जर रिपोर्टमधील तपशिलात कसलीही तफावत असेल, तर तुम्ही लगेच संबंधित वित्तीय संस्थेशी संपर्क साधून दुरुस्ती करून घेतली पाहिजे.
स्कोअरवर कशाचा परिणाम होतो आहे?
क्रेडिट स्कोअर साधारणपणे ३०० ते ९०० दरम्यान असतात आणि जर तुम्ही ७५० चा आकडा ओलांडलात, तर वित्तीय संस्था सहसा कर्ज द्यायला नाही म्हणत नाहीत. जर तुमचा स्कोअर ७५० पेक्षा कमी असेल, तर ज्यामुळे स्कोअर कमी होत आहे त्या कारणांकडे लक्ष द्या. स्कोअर कमी करण्यास कारणीभूत होणारे घटक असतात उशीरा केलेली परतफेड, परतफेड न करणे, परतफेड न केल्यामुळे रद्द झालेले कर्ज इत्यादी. या कारणांची नोंद घ्या आणि स्कोअर वाढवण्यासाठी उपाय करा.
वित्तीय संस्थांकडून स्कोअरची चौकशी
जेव्हा तुम्ही कर्जासाठी अर्ज करता, तेव्हा वित्तीय संस्था तुमच्या क्रेडिट रिपोर्टचा अभ्यास करून तुमची पात्रता आणि व्याजाचा दर ठरवतात. क्रेडिट रिपोर्टची ही चौकशी, जी वित्तीय संस्था तुमचे आर्थिक स्वास्थ्य पाहाण्यासाठी करतात, त्याला अपरिहार्य चौकशी म्हटली जाते आणि यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खाली येतो. अशा चौकशीनंतर तुमच्या रिपोर्टमध्ये त्या चौकशीची तारीख, कर्जाचा तपशील, कर्जाचा आकडा इत्यादी माहिती असते. अनेक वेळा कर्जासाठी अर्ज केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो. म्हणूनच, एखाद्या वित्तीय संस्थेकडून कर्जासाठी नकार आल्यानंतर पुन्हा अर्ज करणे टाळा. कर्जासाठी चौकशी करताना बँकेला अपरिहार्य चौकशी करण्याची परवानगी त्याच परिस्थितीत द्या जेव्हा तुम्ही कर्ज घेण्याचे नक्की ठरवलेले असेल. अशा अधिक चौकशा तुम्ही कर्जासाठी आसुसलेले आहात असे दर्शवू शकेल.
आदिल शेट्टी
सीईओ, बँकबझार