एकापेक्षा अधिक बँक खाती असणे हे अतिशय सामान्य आहे. एका विशिष्ट कालावधीमध्ये खात्यामध्ये व्याज जमा होण्याव्यतिरिक्त इतर कुठलाही व्यवहार झाला नाही तर ते बँक खाते निष्क्रिय होते. हे खाते पुन्हा सक्रिय केल्याशिवाय त्यातील पैसे काढता येत नाहीत. तसेच या खात्यांमध्ये किमान बॅलन्स ठेवणे गरजेचे असल्याने त्यातून सर्व पैसे काढणेही शक्य नसते. या संदर्भात तुम्हाला बँक खाते उघडण्याचा मूळ उद्देश लक्षात ठेवायला हवा. यामागील विचार आहे पैशाची तातडीच्या गरजेसाठी पैसे एका सुरक्षित ठिकाणी ठेवणे आणि त्यावर व्याज कमावणे. ही गरज फक्त एक किंवा दोन खात्यांमधून पूर्ण होते. खरं तर, अधिक बँक खाती ठेवणे म्हणजे डोक्याला तापच आहे. त्यामुळे, साधारणपणे, डोक्याला अनावश्यक ताण देणे टाळण्यासाठी आणि खात्यांचे नीट नियोजन करण्यासाठी फार बँक खाती नकोत. यातील काही खाती एकत्र केल्यास किंवा अनावश्यक खाती बंद केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो.

किमान बॅलन्स ठेवणे

बहुतांश सेव्हिंग्स खात्यांमध्ये तुम्हाला किमान बॅलन्स ठेवावा लागतो आणि ही रक्कम २५ हजारापर्यंत असू शकते. किमान बॅलन्स न ठेवल्याने तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तेव्हा तुमची जेवढी अधिक बँक खाती असतील, तेवढे अधिक पैसे तुम्हाला फक्त प्रत्येक खात्यासाठी किमान बॅलन्स ठेवायला लागतील. अशाने या खात्यांमध्ये तुमचा पैसा अडकून राहील आणि त्याचा वापर तुम्हाला इतर गुंतवणुकींसाठी करता येणार नाही.

विविध शुल्कांचा भरणा

अनेक बँक खाती असल्याने त्यांच्या डेबिट कार्ड, एटीएमचा वापर, एसएमएस सूचना अशा सेवांसाठी तुम्हाला प्रत्येक खात्यासाठी विशिष्ट शुल्क द्यावे लागते, तुम्ही ते खाते वापरत असाल किंवा नाही हा प्रश्नच नाही. किमान बॅलन्स न ठेवल्यास त्याचा दंड ६०० रुपयांपर्यंत असू शकतो. खाते वापण्यात अनियमितता असल्याने तुमचा त्या बँकेशी असलेल्या नात्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो ज्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो.

खात्याचा विसर पडणे

अनेक वेळा अनेक खाती असताना सुद्धा लोक फक्त एक किंवा दोन खाती नियमित वापरतात. अशाने तुम्हाला इतर खात्यांचा विसर पडून त्यांची निष्क्रिय होण्याची शक्यता वाढते. अशा खात्यांवर वाईट लोकांची नजर पडल्याने निष्क्रिय खात्यांचा गैरवापर होण्याचा धोकाही असतोच. तुम्ही ते खाते पुन्हा सक्रिय केल्याशिवाय तुम्हाला त्यातील व्याजसुद्धा काढता येत नाही.

टॅक्स फायलिंगमध्ये अडचणी

मिळकत कराचे रिटर्न भरताना तुम्हाला तुमच्या सर्व बँक खात्यांचे तपशील द्यावे लागतात. हे मोठे काम असू शकते. म्हणूनच, आपला पैसा अनेक बँक खात्यांमधून वाटून ठेवण्याऐवजी त्याला एक किंवा दोनच खात्यांमध्ये ठेवल्याने तुम्हाला अधिक बॅलन्स सुद्धा खात्यामध्ये ठेवता येईल. अशाने तुम्हाला वरच्या दर्जाच्या सेव्हिंग्स खात्याचे फायदेही मिळू शकतील. अशा सेव्हिंग्स खात्यांमध्ये काही सेवा, ज्यांच्यासाठी इतर खातेधारकांना पैसा द्यावा लागतो, त्या तुम्हाला कमी शुल्काने किंवा विनामूल्य मिळू शकतात, जसे चेकबुक मागवणे, डेबिट कार्ड, पैसे ट्रांसफर करणे, नक्कल पासबुक मागवणे इत्यादी.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार