भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान कंटेंट सेन्सॉरशिपवरुन सरकार आणि ट्विटरमधील वाद समोर आला होता. काही ट्विट आणि खात्यांवर निर्बंध लादण्याचे सरकारचे आदेश ट्विटरकडून पाळण्यात आले नव्हते. त्यानंतर आता ट्विटरला पर्याय म्हणून मेड इन इंडिया Koo अ‍ॅप चर्चेत आलं आहे. इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपला पर्याय म्हणून Sandes अ‍ॅप चर्चेत असतानाच आता माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरसाठीही नवीन मेड इन इंडिया अ‍ॅप आलं आहे. गेल्या वर्षी ट्विटरसाठी पर्याय म्हणून tooter नावाची वेबसाइट आली होती आणि आता Koo App ट्विटरला भारतीय पर्याय म्हणून आलं आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनीही मंगळवारी ट्विटरचा स्वदेशी पर्याय Koo अ‍ॅपवर अकाउंट बनवलं. गोयल यांनी स्वतः ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली.

काय आहे Koo अ‍ॅप?
Koo अ‍ॅप आत्मनिर्भर भारत अ‍ॅप्लिकेशन चॅलेंजमध्ये सहभाग घेतला होता. Koo चा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातही केला होता. Koo अ‍ॅपवर भारतीय भाषांमध्ये ट्विटरप्रमाणे माइक्रोब्लॉगिंगचा अनुभव मिळतो. सोप्या शब्दात सांगायचं तर Koo म्हणजे ‘मेड इन इंडिया’ ट्विटर आहे. हिंदी, इंग्रजी, मराठीसह आठ भारतीय भाषांचा सपोर्ट या अ‍ॅपमध्ये आहे. Koo चा वापर अ‍ॅपसोबतच वेबसाइटवरुनही करता येतो. याचा इंटरफेस ट्विटरप्रमाणेच असून शब्दांची मर्यादा 350 आहे.

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशिवाय अन्य काही मंत्र्यांनीही Koo अ‍ॅपवर अकाउंट क्रिएट केल्याचं समजतंय. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा हे देखील Koo वर आहेत. याशिवाय, विविध सरकारी मंत्रालये आणि विभागांची खातीही आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, माय गाव, डिजिटल इंडिया, इंडिया पोस्ट, नॅशनल इन्फॉर्मेटिव्ह सेंटर (NIC), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉमन सर्व्हिस सेंटर, उमंग अ‍ॅप, डिजी लॉकर, नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाच्या हँडल्सचा समावेश आहे.