व्हॉट्स अॅप हे सध्या अनेकांच्या गळ्यातील ताईत झाले आहे. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेच या अॅप्लिकेशनचा सर्रास वापर करताना दिसतात. हे अॅप वापरणे सोपे व्हावे यासाठी कंपनीकडून सातत्याने विविध प्रयत्न होताना दिसतात. नुकताच व्हॉट्सअॅपने असाच एक बदल केला असून त्याद्वारे आपल्याला आलेल्या मेसेजला रिप्लाय करणे आणखी सोपे होणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला तुमचे अॅप्लिकेशन अपडेट करावे लागणार आहे. आपल्याला आलेल्या एखाद्या मेसेजला, फोटोला किंवा व्हिडियोला तुम्हाला रिप्लाय करायचा असेल व्हॉटसअॅपने नव्याने सुविधा दिली होती. यामध्ये तुम्हाला विशिष्ट मेसेज सिलेक्ट करुन वरती असलेल्या बाणावर क्लिक केल्यावर रिप्लाय करण्याचा पर्याय होता. परंतु आता तेवढे करण्याचीही आवश्यकता नाही. कारण अशाप्रकारे विशिष्ट मेसेजला रिप्लाय करणे आणखी सोपे होणार आहे.

तुम्हाला आता अशाप्रकारे एखाद्या मेसेजला रिप्लाय करायचा असेल तर वरच्या बाजूला असलेल्या बाणावर जाण्याची आवश्यकता नाही. रिप्लाय करायचा असलेला मेसेज चॅट विंडोमध्ये उजवीकडे सरकवल्यास रिप्लायचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एखाद्या ग्रुपमध्ये खूप मेसेज पडले असतील आणि तुम्हाला नेमक्या मेसेजला उत्तर द्यायचे असल्यास तुमचे कष्ट नक्कीच वाचणार आहेत. त्यामुळे अॅप्लिकेशन वापरणे आणखी सोपे होणार आहे. नुकतेच व्हॉटसअॅपने स्टीकरचे नवीन फीचर आणले होते. हे फीचर अतिशय कमी वेळात मोठ्या प्रमाणात गाजले. अनेकांना हे स्टीकर कसे तयार करायचे हे माहित नसल्याने युजर्समध्ये याबाबत जास्त उत्सुकता होती.