व्हॉटसअॅपच्या ग्रुप अॅडमिनबद्दल कायमच काही ना काही जोक होत असतात किंवा काहीतरी चर्चा रंगत असतात. कोणत्या ग्रूपमधून धर्म आणि जातीशी निगडीत मेसेज एकमेकांना करण्यात आल्यास अॅडमिनला त्यासाठी जबाबदार धरले जाईल असा नियम नुकताच करण्यात आला होता. आता त्याही पुढे जात अॅडमिनला आणखी एक नवीन अधिकार मिळणार आहे. ग्रूपमध्ये पोस्ट कोण टाकणार ते ठरवण्याचा अधिकार व्हॉट्सअॅपने अॅडमिनला दिला आहे. मेसेज, फोटो, व्हिडिओ, जीआयएफ आणि व्हॉईस मेसेज कुणी पाठवायचा, याचा निर्णय अॅडमिन घेईल.

WABetaInfo च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपच्या 2.17.430 या व्हर्जनमध्ये ही नवी अपडेट देण्यात आली आहे. हे नवीन व्हर्जन अँड्रॉईड आणि आयफोन या दोन्हीमध्ये उपलब्ध असेल असे सांगण्यात आले आहे . “Restricted Groups” असं या नव्या सेटिंगचं नाव असेल असा अंदाज आहे. यामध्ये अॅडमिन ग्रुपमधील एखाद्या सदस्याला ग्रूपमध्ये मेसेज करण्यास बंदी घालू शकतो. अशावेळी तो व्यक्ती ग्रूपमध्ये केवळ मेसेज वाचू शकतो. पण कोणत्याच मेसेजला रिप्लाय करु शकत नाही. बंदी घातलेल्या ग्रूपमधील सदस्याला ‘मेसेज अॅडमिन’ या ऑप्शनवर क्लिक करुन मेसेज करावा लागेल. मात्र तो अॅडमिनने स्वीकारणं गरजेचं आहे.

ग्रूप अॅडमिनला व्हॉट्सअॅप आणखी अधिकार देणार, असं वृत्त ऑक्टोबरमध्ये समोर आलं होतं. ग्रूपमधील कोणते सदस्य ग्रुपचं नाव आणि आयकॉन बदलू शकतात, हे आता ग्रूप तयार केलेला अॅडमिन ठरवू शकेल, असं त्यावेळी समोर आलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. नुकतेच व्हॉटसअॅपने ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ आणि ‘नोटिफिकेशन हिस्टरी’ ही नवीन फिचर्स आणली होती. त्यानंतर व्हॉईस कॉल व्हिडिओ कॉलमध्ये स्वीच करता येईल. व्हॉट्सअॅप सध्या ‘व्हिडिओ टू व्हॉईस कॉल स्वीच’ या फिचरवर काम करत आहे. या फिचरमुळे व्हॉईस कॉलवर बोलत असतानाच कॉल कट न करता व्हिडिओ कॉलमध्ये तो स्वीच करता येईल. तर व्हिडिओ कॉल व्हॉईस कॉलमध्ये बदलता येईल. मात्र, यासाठी तुम्हाला समोरच्या व्यक्तीची परवानगी लागेल. विशेष म्हणजे या फीचरसोबतच कॉल रेकॉर्डिंग फीचरही देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.