व्हॉटसअॅप या अॅपला सर्वच स्तरातून अतिशय कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. सध्या हे अॅप्लिकेशन म्हणजे अनेकांच्या गळ्यातील ताईतच झाले आहे. विशेष म्हणजे या अॅप्लिकेशनने कायमच विविध बदल करत युजर्सना खूश करण्याचे काम केले आहे. यामध्ये आणखी एक भर पडली असून आता व्हॉटसअॅपने व्यावसायिकांसाठी आपले आणखी एक वेगळे व्हॉटसअॅप सुरु केले आहे.

नेहमीच्या व्हॉटसअॅपप्रमाणेच गुगल प्ले स्टोअरमधून हे अॅप्लिकेशन युजर्सना डाऊनलोड करता येईल. ४.०.३ या आणि यांच्या वरील सर्व अँड्रॉईड व्हर्जनसाठी हे अॅप्लिकेशन काम करेल. या अॅप्लिकेशन्समध्ये व्यावसायिकांसाठी विशेष सुविधा देण्यात आल्या असून त्यामुळे त्यांना आपल्या ग्राहकांशी सहज कनेक्ट राहता येणार आहे. यासाठी कंपनीने बुकमायशो, नेटफ्लिक्स आणि मेक माय ट्रीप यांसारख्या वेबसाईटबरोबर टायअप केले आहे. हे अॅप्लिकेशन आधी इंडोनेशिया, इटली, मॅक्सिको, ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये लाँच केल्यानंतर आता ते भारतात लाँच करण्यात आले आहे.

अॅप लाँच करण्याच्या आधी त्याची भारत आणि ब्राझील या दोन देशांमध्ये चाचणी करण्यात आली आहे. लहान व्यावसायिकांना समोर ठेऊन हे अॅप्लिकेशन तयार करण्यात आले असून त्यांना या अॅप्लिकेशनचा निश्चितच फायदा होईल असे कंपनीचे म्हणणे आहे. यामध्ये व्यावसायिक आपली प्रोफाईल तयार करुन व्यवसायाशी संबंधित इतर माहिती लिहू शकणार आहेत. यामध्ये एक विशेष मेसेज सर्व्हीस देण्यात आली आहे, ज्याव्दारे सामान्यपणे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील.

या अॅप्लिकेशनमध्ये व्हॉटसअॅप वेबही वापरता येणार आहे. जेणेकरुन व्यावसायिकांना लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरुन आपल्या ग्राहकांशी संपर्क साधणे सोईचे होईल. याशिवाय एखादा रिप्लाय नंतर करायचा असल्यास तो शेड्यूल करण्याची सुविधाही यामध्ये देण्यात आली आहे. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारत आणि ब्राझीलमधील ८० टक्क्यांहून जास्त व्यावसायिकांनी ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी हे अॅप्लिकेशन उपयुक्त ठरेल असे मत नोंदविले आहे.