लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर दररोज असंख्य मेसेज फॉरवर्ड होतात. यातील अनेक मेसेज फेक असतात किंवा अर्धवट माहितीसह शेअर केलेले असतात. करोना व्हायरसच्या संकटाशी देश लढत असतानाही WhatsApp वर अनेक फेक मेसेजचा सुळसुळाट झालाय. आता अशा मेसेजेसवर आळा घालण्यासाठी WhatsApp एक खास फीचर आणायच्या तयारीत आहे. सध्या या फीचरची सध्या चाचणी सुरू असून लवकरच हे फीचर सर्व युजर्ससाठी रोलआउट केले जाईल, अशी माहिती WABetaInfo द्वारे देण्यात आली आहे. या फीचरद्वारे फॉरवर्डेड मेसेज WhatsApp मध्येच अगदी सहजपणे क्रॉसचेक करता येतो. जाणून घेऊया कसं काम करतं हे फीचर :-

WABetaInfo ने नव्या फीचरचा एक फोटोही शेअर केला आहे. नव्या फीचरमध्ये मेसेजच्या समोर एक ‘मॅग्निफाइंग ग्लास’चा आयकॉन युजर्सना दिसेल. या आयकॉनवर टॅप करुन संबंधित मेसेज खरा आहे की नाही हे क्रॉसचेक करता येईल. पण, अनेकदा फॉरवर्ड झालेले मेसेजच (frequently forwaded messages)या फीचरद्वारे क्रॉसचेक करता येतील. कंपनीकडून बीटा युजर्ससाठी हे फीचर हळुहळू रोलआउट केलं जात असल्याचं समजतंय. गेल्या आठवड्यात अनेक बीटा युजर्सना हे फीचर टेस्टिंगसाठी देण्यात आलं असून टेस्टिंगनंतर सर्व युजर्सना स्टेबल अपडेटमध्ये हे फीचर मिळेल अशी शक्यता आहे. केवळ तीन स्टेपमध्ये जाणून घेऊया कसं वापरायचं हे फीचर :-

-मेसेज क्रॉसचेक करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मॅग्निफाइंग ग्लास आयकॉनवर टॅप करावं लागेल.
-यानंतर, ‘ तुम्हाला हे वेबवर सर्च करायचं आहे का? असा प्रश्न विचारणारी पॉपअप विंडो ओपन होईल.
-तुमची परवानगी मिळाल्यानंतर नंतर तो मेसेज गुगलवर अपलोड होईल आणि सत्यता पडताळली जाईल.