व्हॉटसअॅपच्या पेमेंट फिचरची मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा असून अखेर हे फिचर लाँच झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. सध्या अँड्रॉईड आणि आयफोनच्या काही ठराविक युजर्सना हे फिचर वापरता येणार असून त्याची चाचणी सुरु आहे. हे अॅप्लिकेशन युनिफाईड पेमेंटस इंटरफेस (UPI) स्वरुपाचे असेल असेही म्हटले आहे. त्यामुळे ही चाचणी यशस्वी झाल्यावर लवकरच हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयफोनसाठी व्हॉटसअॅपचे v2.18.21 व्हर्जन चालणार असून अँड्रॉईडसाठी v2.18.41 हे व्हर्जन असेल असे सांगण्यात आले आहे.

सध्या व्हॉटसअॅप हे देशात सर्वाधिक वापरले जाणारे अॅप्लिकेशन असून याव्दारे पेमेंटची सुविधा सुरु होणे ही आनंदाची बाब आहे. कधी एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी, कधी कामासाठी तर कधी चांगले फोटो आणि व्हिडिओज शेअर करण्यासाठीही याचा उपयोग होतो. व्हॉटसअॅप सतत आपल्या यूजर्सना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देत आकर्षित केले आहे. त्यात आता आणखी एक भर पडणार आहे. अॅटॅचमेंटमध्ये डॉक्युमेंटस, गॅलरी, ऑडिओ, लोकेशन, कॉन्टॅक्टस यांच्या बाजूला हा पेमेंटचा पर्याय दिसेल.

या फिचरव्दारे थेट बँकेतून पैसे एखाद्या व्यक्तीच्या अकाऊंटवर ट्रान्सफर करता येणार आहेत. व्हॉटसअॅप एका बँकेसोबत आधीपासूनच याबाबतची चाचणी करत होती. काही दिवसांपूर्वी ही चाचणी पूर्ण झाली असून आता प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरु होत आहे. सध्या चाचणीसाठी व्हॉटसअॅपची स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकेशी बोलणी सुरु होती. टप्प्याटप्प्याने आणखी बँकांना यामध्ये सामावून घेतले जाणार आहे. अशाप्रकारे बँकेचे व्यवहार व्हॉटसअॅपव्दारे करायचे असल्यास त्यासाठी सुरक्षेच्यादृष्टीनेही विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याने त्यादृष्टीने काम सुरु असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. शेवटच्या टप्प्यात ठराविक युजर्ससोबत या नव्या फिचरचे टेस्टींग होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.