फेसबुकने गेल्या महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपवरही ‘मेसेंजर रुम्स’ हे फीचर उपलब्ध होईल असे सांगितले होते. यानंतर कंपनीने अँड्रॉइड अ‍ॅपच्या बीटा व्हर्जनवर या फीचरची टेस्टिंग सुरू केली होती. पण, आता मिळालेल्या माहितीनुसार हे फीचर स्मार्टफोनवर येण्याआधी Whatsapp Web साठी रोलआउट केले जाणार आहे. WhatsAppWeb वर व्हिडिओ कॉलिंगचा पर्याय असलेले हे फीचर लवकरच उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

लॉकडाउनमुळे व्हिडिओ कॉलिंगचं वाढलेलं प्रमाण बघून फेसबुकने गेल्या महिन्यात मेसेंजर रूम्स हे नवीन फीचर आणले. याद्वारे एकाचवेळी 50 जणांना व्हिडिओ कॉल करता येणे शक्य आहे. ‘Messenger Rooms’ हे फीचर फेसबुक मेसेंजरमध्येच क्रिएट करण्यात आले आहे. आता हे फीचर लवकरच WhatsApp Web च्या युजर्ससाठी उपलब्ध होणार असल्याचं, व्हॉट्सअ‍ॅपचे सर्व फीचर्स ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo कडून सांगण्यात आलंय.

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, मेसेंजर रूम्सचा शॉर्टकट आपल्या वेब प्लॅटफॉर्मवर अ‍ॅड करण्याचं WhatsApp कडून काम सुरू आहे. हे फीचर वेब व्हर्जन 2.2019.6 मध्ये उपलब्ध आहे. पण सर्व युजर्ससाठी अद्याप हे फीचर लॉन्च करण्यात आलेले नाही. याशिवाय फोनमधील मुख्य अ‍ॅपमध्ये मेसेंजर रुम्स हे फीचर वेगळं देण्याची कंपनीची योजना आहे. म्हणजे डॉक्यूमेंट्स आणि गॅलरी पर्यायांप्रमाणे मेसेंजर रुम्सचाही नवीन आयकॉन दिसू शकतो. पुढील महिन्यापर्यंत हे फीचर युजर्ससाठी उपलब्ध केली जाण्याची शक्यता आहे.