इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्स अॅपने ‘फॉरवर्ड मेसेज इंडीकेटर’ या फीचरची सुरूवात केली आहे. या फीचरद्वारे आता कोणत्याही युजरला त्याला आलेला मेसेज फॉरवर्ड केलेला आहे की स्वत: टाइप केलाय हे लगेच समजणार आहे.

खोट्या मेसेजेसमुळे हिंसक घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्स अॅपला केंद्र सरकारने कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर व्हॉट्स अॅपने याची गंभीर दखल घेऊन मंगळवारी देशभरात मुख्य वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देत नागरिकांना जागरुक करण्याचा प्रयत्न केला होता.

या नव्या फीचरबाबत मंगळवारी रात्री उशीरा व्हॉट्स अॅपने माहिती दिली. जगभरात याबाबतचं परिपत्रकही कंपनीकडून जारी करण्यात आलं आहे. या फीचरद्वारे प्रत्येक फॉरवर्ड मेसेजच्या वर डाव्या बाजूला ‘Forwarded’ असा लेबल दिसणार आहे. विशेष म्हणजे हे लेबल हटवता येणार नाही, त्यामुळे फॉरवर्ड मेसेज आणि मूळ मेसेज यांच्यातील फरक ओळखणं शक्य होणार आहे. पण या नव्या फीचरमुळे फेक न्यूजवर कशाप्रकारे आळा बसेल यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहेत. या फीचरसाठी युजर्सनी व्हॉट्स अॅपचं लेटेस्ट व्हर्जन अपडेट करावं असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.