|| गुंजन कुलकर्णी, बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ

कुटुंब, नाती, व्यवसाय-नोकरी इत्यादी जबाबदाऱ्या सांभाळत तारेवरची कसरत करताना ‘ती’ पार थकून जाते. शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ाही. कधीकधी परिस्थिती इतकी बिनसते की तिचे तिलाच उमगत नाही. अशा वेळेस यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि यासाठी आवश्यकता भासल्यास कुटुंबाची, तज्ज्ञांची मदतही नक्की घ्यावी.

‘‘मला भटकं ती करायला आवडतं. आयुष्यभर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मनातल्या मनातच केली भटकंती. आता हे निवृत्त झालेत, मुलं मार्गी लागलीत. दोन वर्षांपूर्वी मी एक ग्रुप जॉइन केला. आठवडय़ातून एकदा तरी आम्ही मस्त भटकंतीला जातो..कधी ट्रेकिंग, कधी पिकनिक, कधी एखादं ठिकाण बघायला मजा येते’ -६५ वर्षांच्या वीणाताई.

‘‘मी इतकी वर्षे प्रयत्न करत राहिले की घरातल्या सगळ्यांचं एकमेकांशी चांगलं नातं असावं. त्यासाठी कधी त्यांच्या भांडणांत पडले, कधी एकाची बाजू घेऊन दुसऱ्याचा रोष ओढवून घेतला. कधी मुलांना प्रोटेक्ट करत राहिले. पण आता मी सोडून देते खूप गोष्टी. शांत वाटतं. तणाव कमी झालाय’’ -पन्नाशीला आलेली रागिणी.

‘‘आमच्या मुलाचा जन्म झाला त्यानंतर मी स्वत: करिअरमध्ये ब्रेक घ्यायचं ठरवलं. खूप भले-बुरे सल्ले मिळाले तेव्हा. पण मी आणि पतीने सर्व बाजूंचा विचार करून घेतला हा निर्णय. आपण कमवत नाही तर घरातलं, मुलाचं सगळं काही परिपूर्ण व्हायला हवं, असं मी ठरवलं. मग वेळ, एनर्जी पुरेना. थकवा यायला लागला, चिडचिड व्हायला लागली. आता मी रोज स्वत:साठी दोन तास राखून ठेवले आहेत. घराचा, कुटुंबीयांचा, कामांचा काहीही विचार न करता मी या दोन तासांत मला हवं ते करते. मी लायनीवर आले आहे आणि आता घरही येतंय!’’ -तिशीतली स्वाती.

‘‘फायनली मी खूप धैर्य गोळा करून बाबाला सांगितलं की, मी आता तो आणि आई यांच्यात मिडिएटर बनणार नाही. त्यांचे वाद त्यांनी हाताळावेत. लहानपणापासून त्यांच्या वादावादीत माझं बॅडमिंटनचं शटल झालंय. टोकाचा राग, भीती, असुरक्षितता, खूप दु:ख, अपराधीपण अशा कितीतरी भावनांमध्ये स्विंग होत राहिले मी सतत. आई म्हणते की मुलींची सहनशक्ती खूप जास्त असते म्हणे! पण असली स्वत:लाच ‘सहन’ न होणारी ‘शक्ती’ नकोच आहे मला. माझी स्वप्नं खूप मोठी आहेत. अ‍ॅडजस्ट करत राहिले तर अचिव्ह कधी करणार?’’ -निव्वळ १५ वर्षांची गार्गी.

प्रत्येकीचं वय वेगळं, व्यथा वेगळी आणि वाट वेगळी असली तरी प्रवासाची दिशा मात्र एक आहे..’स्व’ च्या शोधात निघालेल्या अशा अनेक जणी व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यात भेटत राहतात. त्यांची एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते ती म्हणजे, त्या स्वत:च्या भावनांना, विचारांना स्वत:च प्राधान्य आणि आदर देत असतात.. इतरांनी ते द्यावं, अशी वाट पाहत बसत नाहीत.

त्यामुळे मग, ‘शाळा-कॉलेज मध्ये मी खूप अ‍ॅक्टिव्हिटीज करायचे. लग्न करून यांच्या घरी आले आणि माझी फार कुतरओढ झाली. सगळा उत्साहाच संपला.’ असे विचार करून वीणाताई स्वत:ला हतबल नाही समजत. संसारासाठी, कुटुंबासाठी सर्वस्व विरघळवून टाकणारी रागिणी मग, ‘माझी कुणाला किंमतच नाही.’ या नकारात्मकतेची शिकार होत नाही. ‘माझं सगळं काम व्यवस्थितच असलं पाहिजे. कोणी मला जज करता कामा नये.’ या स्वत:च्याच अतिकाटेकोर आणि अतक्र्य विचारांना बळी पडण्यापासून स्वाती स्वत:ला रोखू शकते. कळायला लागल्यापासून घरातल्या अस्थिर वातावरणात सतत दडपणाखाली राहिलेली गार्गी, या दडपणाला दूर लोटण्याचं धाडस गोळा करू शकते.

यातील प्रत्येक जण, आधी स्वत:मध्ये बदल करते आणि मग परिस्थितीतून मार्ग काढते. परिस्थितीची, सामाजिक दबावाची, कौटुंबिक अन्यायाची, इतकं च काय, तर स्वत:च्या अतार्किक विचारांचीही गुलाम (व्हिक्टीम) होण्याला ती ‘जाणीवपूर्वक नकार’ देते. या सर्वजणींना  ही करण्याची हिंमत कधी जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या आधारामुळे आली तर कधी मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने..

परिस्थितीवर दोष टाकून देणं सोपं असतं. मग ‘बिच्चारी मी’ अशी भूमिका घेता येते. मैत्रिणींबरोबर ‘समाज स्त्रियांच्या बाबतीत किती अन्यायकारक आहे’, अशा चर्चा करून ‘असहाय्य’ वाटून घेता येतं. या विचारांतून मग नैराश्य, आकस, तिरस्कार, कडवटपणा, शरणागती, अपराधीपण, नकारात्मकता अशा स्वत:साठी आणि आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी घातक ठरणाऱ्या तीव्र भावना निर्माण होतात. त्यातून बदलाच्या संधी हातातून निसटत जातात. वय, लिंग, धर्म, जात, हुद्दा, सामाजिक स्तर, शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी यापैकी कुठलाच निकष ‘विचार करणाऱ्या मनाला’ अडवत नाही हे जगभरात सर्वत्र अनेकदा सिद्ध झालेलं आहे. स्वत:च्या विचारांमध्ये बदल करून स्वत:चं आयुष्य बदलण्याचा पर्याय आणि अधिकार प्रत्येकाला उपलब्ध असतो याचं आपल्याला स्मरण राहायला हवं. मानसिक गुंतागुंतीमध्ये अडकलेल्या अशा स्त्रियांना प्रत्येक वेळेस स्वत:च वाट शोधता येईल, असे नाही. अशा वेळेस जवळच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक, कुटुंबीयांनी ती अशीच आहे असे दुर्लक्ष न करता तिच्यातील बदलांकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे, त्याचा मागोवा घेणे गरजेचे आहे. आवश्यकता भासल्यास तिला यातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्याचे पाऊलही उचलणे महत्त्वाचे आहे.

email – gunjan.mhc@gmail.com