होळी झाली आणि हिवाळा संपला. तापमापकाचा पारा अचानक उडी मारून उंचावू लागला आहे. तर दर वर्षी वाढत चाललेल्या उन्हाळ्यात सतत घाम येऊन शरीरातील पाणी कमी होते. खूप गळून गेल्यासारखे होते. या गरमागरम दिवसात प्रत्येक जण आपापल्या समजुतीनुसार शरीराला गारवा देण्याचा प्रयत्न करतो. तसे पहिले तर, उन्हाळ्याचा काळ म्हणजे आहारावर सहजरित्या नियंत्रण करायला आणि वजन कमी करायला अगदी  उत्तम ऋतू ठरू शकतो. या काळात हेल्दी राहण्यासाठी काही सोपे उपाय करता येतात. उन्हाळ्याच्या काळात जास्त कॅलरीजचे पदार्थ  टाळून कमी कॅलरीजच्या पदार्थांकडे आहार वळवावा. यामुळे थंडावा निर्माण होण्यासोबतच वजन कमी होते, उत्साह आणि कार्यक्षमतादेखील वाढते.यासाठी खालील गोष्टींचा अवलंब करा.

⦁ पाणी – शरीरात गारवा निर्माण करायला पाण्यासारखे दुसरे साधन नाही. गार पाण्याने अंघोळ, दिवसातून चार-पाच वेळा गार पाण्याने चेहरा धुणे आणि संध्याकाळी थंड पाण्याचा शॉवर घेणे यामुळे शरीर गार राहते. विशेष म्हणजे यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडण्यास मदत होते. उन्हाळ्यामध्ये किमान ३-४ लिटर पाणी प्यावे. यामध्ये साधे गार पाणी आणि इतर द्रवपदार्थ यांचा वापर करावा. शरीराला गारवा वाटण्यासाठी फ्रीजमधील पाणी पिण्यापेक्षा माठातील वाळा घातलेले पाणी उत्तम.

⦁ सरबते आणि पेये –  उन्हाचा त्रास होऊन खूप गरम व्हायला लागले की सॉफ्ट ड्रिंक्स, कोल्ड कॉफी किंवा फ्रीजमधील थंड पाण्याची बाटली तोंडाला लावणे ही आजची खास ‘इन थिंग’ आहे. मात्र या कार्बोनेटेड आणि कॅफीनेटेड पेयांमुळे शरीर अधिक पाणी उत्सर्जित करते. त्यामुळे डीहायड्रेशन होऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जास्त थकवा येतो. त्यामुळे सॉफ्ट ड्रिंक्स ऐवजी लिंबू सरबत, ताक, शहाळे, पन्हे, फळांची सरबते, घरी तयार केलेले ताज्या फळांचे ज्यूस, भाज्यांचा रस अधिक चांगले. या पेयात नैसर्गिक सोडियम, पोटॅशियम असल्यामुळे घामाद्वारे शरीरातून बाहेर पडणारे क्षार भरून काढले जातात. ठराविक वेळाने या पेयांचा आस्वाद घेतल्यास त्याचा फायदा होतो.

⦁ सब्जा आणि तुळशीचे बी – सब्जा पाण्यामध्ये भिजवून ताक, फालुदा, सरबते किंवा नुसत्या थंड पाण्यामध्ये घालून प्यायले जाते. या दोन्हीमुळे शरीराला कमी वेळात गारवा मिळतो.

⦁ दही – उन्हाळ्यात आहारामधल्या प्रथिनांचा समावेश कमी होतो. नॉनव्हेज पदार्थ पचायला जड असल्याने त्यांचे सेवन आहारात कमी असावे. दही किंवा सैंधव (काळे मीठ) आणि जिरे पूड टाकून बनवलेल्या ताकामधून आपल्याला प्रोटीन्स मिळतात. आणि त्यामुळे वजन घटण्यास मदत होते. ताज्या दह्यामधून शरीरास आवश्यक असलेले  घटक मिळून पचनशक्ती सुधारते.

⦁ फळे आणि भाज्या – काकडी, कलिंगड अशा थंडावा देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश असावा. उष्णतेवर मात करण्यास आणि त्यातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे आरोग्याला उपयुक्त ठरतात. उन्हाळ्यात उपलब्ध असणारी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश ठेवल्यास जीवनसत्वे, खनिजे, फायबर, पाणी मिळून आपली कार्यक्षमता वाढते.

डॉ. अविनाश भोंडवे

फॅमिली फिजिशियन