26 January 2020

News Flash

‘या’ कारणांमुळे भारतीय आयफोन घेणे टाळतात

भारतीय आयफोन का वापरत नाही?

अ‍ॅपलच्या नव्या आयफोन सीरीजचा अनावारण सोहळा मंगळवारी रात्री पार पडला. अॅपल दरवर्षी सप्टेंबर महिन्यात एक नवीन स्मार्ट फोन किंवा गॅझेट ग्राहकांच्या भेटीला घेऊन येते. सालाबादप्रमाणे या वर्षी देखील अॅपलने iphone 11, iphone 11 Pro आणि iphone 11 Pro Max हे तीन फोन लाँच केले. हे फोन विकत घेण्यासाठी जगभरातील अॅपल चाहते प्रचंड उत्सुक आहेत. परंतु तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असुन देखील भारतीयांमध्ये मात्र याबाबत काहीसा निरुत्साह दिसतो. आयफोन वापरणे हे भारतात काहीसे प्रतिष्ठेचे प्रतिक मानले जाते. परंतु तरीही भारतीय युजर मात्र, या अॅपलच्या फोनकडे पाठ फिरवतात.

भारतीय आयफोन का वापरत नाही?

जगभरात अँड्रॉईड फोनच्या तुलनेत आयफोनची विक्री अधिक होते. भारत टेलिकॉम क्षेत्रात आघाडीवर आहे. भारतात वर्षाला सरासरी तब्बल ५० लाख स्मार्ट फोन विकले जातात. मात्र तरीही आयफोन वापरणाऱ्यांची संख्या अद्याप वाढलेली नाही. आयफोनच्या जगभरातील विक्रीवर लक्ष दिले तर अमेरिकेत ४८ टक्के, युरोपात ४८.३८ टक्के, आफ्रिकेत २४.६ आणि आशिया खंडात १०.७९ टक्के लोक आयफोन वापरतात. या तुलनेने भारतात केवळ २.९ टक्के लोक आयफोनचा वापर करतात. उर्वरित ८२.२ टक्के लोकांचा कल अँड्रॉईड फोन वापरण्याकडे आहे.

आयफोन न वापरण्याची ही आहेत कारणे.. 

  • किंमत – अमेरिका आणि युरोप खंडात आयफोनची किंमत सरासरी ९९९ डॉलर आहे. तर तोच आयफोन भारतात १३०० डॉलरला विकला जातो. म्हणजेच तब्बल ३० टक्के अधिक किंमतीत भारतीयांना आयफोन विकत घ्यावा लागतो. तज्ञांच्या मते आयात कर व मुद्रा रूपांतरण यामुळे अॅपल प्रोडक्टची किंमत वाढते. त्यामुळे एका आयफोनच्या किंमतीत आपल्याला दोन ते तीन उत्तम प्रतीचे अँड्रोईड फोन विकत घेता येतात, हा विचार करुन भारतीय आयफोन विकत घेत नाहीत.
  • फिचर – भारतीय युजर मोठ्या प्रमाणावर मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या विंडोज सॉफ्टवेअरचा वापर करतात. अॅपल गॅझेटचा वापर करताना विंडोज वापरण्यावर बंधने येतात. तसेच मॅक ऑपरेटींग सिस्टममध्ये विंडोज वापरणे ही खुपच गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्यामुळे भारतीय अँड्रॉईड फोनचाच वापर जास्त करतात.
  • क्रेडिट कार्ड – आयफोनचे काही बेसिक फीचर सोडले तर जवळपास सर्वच फिचर आपल्याला क्रेडिट कार्डच्या मदतीने विकत घ्यावे लागतात. २०१८च्या आकडेवारीनुसार भारतात केवळ १ टक्के लोक क्रेडिट कार्ड वापरतात. भारतात क्रेडिट कार्डच्या तुलनेने डेबिट कार्डचा वापर खुप मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसेच जे फिचर किंवा गेम्स आयफोन विकत देते त्यांचा वापर अँड्रॉईडमध्ये फुकटात करता येतो. त्यामुळे लोक अॅपल फोन घेणे टाळतात.
  • मार्केटिंग – कुठलेही उत्पादन विकण्यासाठी त्याची योग्य पद्धतीने जाहिरात करावी लागते. सॅमसंग, व्हिवो, एम.आय. या कंपन्यांनी अॅपलच्या तुलनेत नियोजित पद्धतीने जाहिराती केल्या. त्यांनी इलेक्ट्रॉनिक गॅझेट विकणाऱ्या लहानातल्या लहान दुकानालाही जाहिरात करण्यासाठी मुबलक प्रमाणात पैसे दिले. तसेच दुकानदाराला प्रत्येक फोनच्या विक्रीमागे अॅपलच्या तुलनेत अधिक टक्केवारी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे अतिरिक्त नफ्यासाठी दुकानदारही ग्राहकांना अँड्रॉईड फोन विकत घेण्यास भाग पाडू लागले. परिणामी अॅपल फोनच्या विक्रीत घट झाली.
  • ग्राहक सेवा केंद्र – भारतात अॅपल कंपनीने देऊ केलेली ग्राहक सेवा खुपच खर्चिक आहे. तसेच इतर स्मार्ट फोन्सच्या तुलनेने त्यांची ग्राहक सेवा केंद्र खुप कमी ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होते. परिणामी अॅपलच्या ग्राहक सेवांबाबत असलेल्या कमी माहितीमुळे भारतीय आयफोन घेणे टाळतात.

First Published on September 11, 2019 3:25 pm

Web Title: why apple failed in india mppg 94
Next Stories
1 27 हजार रुपयांनी स्वस्त झाला ‘हा’ लोकप्रिय फोन
2 नवीन ई-स्कूटर लाँच, एकदा चार्ज केल्यावर 90 किमीचं मायलेज
3 कायमस्वरूपी पदांसाठी मुंबई मेट्रोमध्ये बंपर भरती
Just Now!
X