टॅक्स रीटर्न भरायची वेळ येते तेव्हा अनेक जण टाळाटाळ करतात. काहीजण उशिरा भरतात, काहीजण कर्ज काढायची वेळ आल्यावर गरज पडेपर्यंत भरतच नाहीत. अंतिम दिनांक चुकवलेल्या व्यक्तींना प्राप्तिकर विभाग लगेच सूचना पाठवत नसल्याने आयटीआर भरण्यासाठी ते घाई करत नाहीत. अनेक करदात्यांना आयटीआर न भरल्याने ते गमावत असलेल्या लाभांची आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या परिणामांची कल्पनाच नसते. याबाबत बऱ्याचदा खूप गोंधळ असतो. विशेषत: ज्यांचे उत्पन्न करपात्र मर्यादेच्या खाली येते, त्यांनी आयटीआर भरायची गरज असते का याबाबत माहिती करुन घेणे गरजेचे आहे.

आयटीआर भरणे सक्तीचे असते का?

लोकांमध्ये असा गैरसमज असतो की करपात्र उत्पन्न नसणाऱ्या लोकांनी आयटीआर भरायची गरज नसते. प्राप्तिकर विभागाने तुमचे एकूण स्थूल उत्पन्न कोणत्याही वजावटीआधी २.५ लाख रुपयांच्या पलिकडे, ६० वर्षे वय असणाऱ्यांसाठी ३ लाख रुपयांहून जास्त आणि ८० हून जास्त वर्षे वय असणाऱ्यांसाठी ५ लाखांपलिकडे जात असेल तर आयटीआर भरणे सक्तीचे केले आहे. तसेच जर तुम्ही भारतीय रहिवासी असाल आणि देशाबाहेर तुमच्या मालमत्ता किंवा गुंतवणुका असतील, तर तुमचे उत्पन्न करपात्र नसल्यासही तुम्ही रीटर्न फाइल करणे आवश्यक असते. तुम्ही यांपैकी कोणत्याही प्रवर्गात येत नसाल, तर तुम्ही टॅक्स रीटर्न भरणे गरजेचे नसते. परंतु, जरी तुमचे कर दायित्व शून्य असले, तरी रीटर्न भरण्याचे अनेक लाभ असतात. चला त्यांच्यावर नजर टाकू.

कर परताव्याचा दावा करणे

तुमचे उत्पन्न करमर्यादेच्या आत असले, तरी तुम्ही त्यावर कर भरलेला असतो. टीडीएसच्या मार्गे किंवा स्वयंविश्लेषणातून भरलेल्या अतिरिक्त कर्जाच्या परताव्यांचा दावा संबंधित आर्थिक वर्षात तुम्ही करू शकता. तुमच्या करांचा परतावा मिळणे हे तुम्हाला अनेकदा पगार मिळाल्यासारखे वाटते. जर तुम्ही रीटर्न भरले नाहीत, तर तुम्ही हा परतावा सोडून देता.

कर्जासाठी अर्ज करण्यासाठी

जर तुम्ही गृहकर्ज, वाहन कर्ज सारख्या कोणत्याही कर्जासाठी अर्ज करत असाल, किंवा क्रेडिट कार्ड घेत असाल, तर कर्जदात्याकडे इतर कागदपत्रांसोबतच सर्वांत अलिकडील मूल्यांकन वर्षांमधील आयटीआर तुम्हाला सादर करावे लागतात. आयटीआर हे तुमच्या उत्पन्नाचे विवरण असते. यामुळे तुमच्या परतफेडीच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यास कर्जदात्यास मदत होते. तुमचा आयटीआर नसल्यास, कर्ज घेणे खूप अवघड होऊ शकते. म्हणूनच, आयटीआर नसताना, तुम्हाला इतर मार्गांनी तुमचे उत्पन्न आणि परतफेडीची क्षमता सिद्ध करावी लागेल. तुम्हाला परतफेडीतील जोखीम सुरक्षित करण्याकरिता कर्जासाठी सह-अर्जदारास आणण्याची, किंवा तारण देण्याची किंवा इतर मार्गांनी सुरक्षेची हमी देण्याची विचारणा होऊ शकते.

भांडवली तोटे पुढे नेण्यासाठी

जर तुम्ही भांडवली तोटे अनुभवले असतील, तर प्राप्तिकर कायदा तुम्हाला हे तोटे आठ सलग वर्षांकरिता पुढे नेऊ देतो आणि भावी नफे व उत्पन्नांसमोर त्यांची वजावट करण्याची अनुमती देतो. परंतु, हा लाभ घेण्याकरिता तुम्हाला न चुकता दरवर्षी आयटीआर भरावा लागतो. जरी तुमचे उत्पन्न करपात्र नसले, तरी पुढे नेण्याएवढे तोटे तुम्हाला झालेले असू शकतात. म्हणूनच तुम्हाला तोटा झाला असेल आणि तो तुम्हाला पुढे न्यायचा असेल तर दरवर्षी रीटर्न भरणे तुमच्यासाठी आवश्यक असते.

इतर उत्पन्नांसाठी

जरी तुमचे वेतन करचौकटीत बसत नसले, तरी तुम्ही करमुक्त बाँड्स किंवा इतर करपात्र असणाऱ्या स्रोतांमधून उत्पन्न कमावलेले असू शकते. हे उत्पन्न २.५ लाखांहून जास्त असू शकते. तुम्ही तुमचे करपात्र उत्पन्न दाखवणारा आयटीआर भरायला हवा, जो उत्पन्नाचा पुरावा ठरू शकतो.

व्हिसा प्रक्रिया

जर तुम्ही दुसऱ्या देशात स्थलांतर करण्याची योजना आखत असाल किंवा परदेशी नोकरीची संधी शोधत असाल, तर तुमच्याकडे अलिकडील वर्षांचे आयटीआर तयार असायला हवेत. बहुतेक राजदूतावास, विशेषत: युएस आणि युके, तुमच्या व्हिसा अर्जाची प्रक्रिया करण्यासाठी आयटीआरच्या प्रती मागवितात.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार