गरमागरम, कुरकुरीत, खमंग भजी बघितली किंवा त्यांचा वास आला की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटतं. पावसात तर वाफाळत्या चहासोबत गरमागरम भजी म्हणजे आहाहा! त्यामुळे पावसात भजी ही ठरलेलीच. मात्र ही भजी जर तुम्हाला वर्तमान पत्रामधून बांधून मिळत असेल आणि तशीच भजी तुम्ही खात असाल तर मात्र तुमच्या आरोग्यासाठी हे धोकादाक आहे.

अनेक विक्रेते हे तळलेले पदार्थ सर्रास वृत्तपत्रांमध्ये बांधून देतात. भजी, वडे गरम असताना त्यातील तेलामुळे या वृत्तपत्रांवरील शाई खाद्यपदार्थांना लागते. वृत्तपत्रांवर छापण्यात येणाऱ्या मजकुरासाठी वापरल्या जाणाऱ्या शाईत ‘ग्राफाइट’ नावाचा अत्यंत विषारी घटक असतो. तो या पदार्थांमार्फत लाखो मुंबईकरांचा पोटात जातो. ‘ग्राफाइट’मुळे कर्करोग होण्याची शक्यता बळावते.

वर्तमानपत्रामधील शाई तेलकट पदार्थांमध्ये सहज शोषली जाते. शाईमधील ग्रॅफाईट हे शरीरात साचून राहतं आणि त्याचा परिणाम किडनी आणि फुफ्फुसांवर होतो. तसेच वर्तमानपत्राच्या शाईतील सॉल्वंट्स पचनक्रियेत बिघाड करते. हार्मोन्सचे संतुलनही यामुळे बिघडते परिणामी कॅन्सरचा धोका वाढतो. काही जण वर्तमानपत्रांच्या कागदाऐवजी मासिकाच्या कागदाचा जास्त वापर करतात. वर्तमानपत्रापेक्षा मासिकाचा कागद जाड तसेच ग्लॉसी असतो. त्यामुळे तो तेल निथळण्यासाठी जास्त चांगला असे आपल्याला वाटते. परंतु हादेखील गैरसमज आहे. कागद अधिक ग्लॉसी बनवण्यासाठी तसेच शाई स्प्रेड होऊ नये म्हणून वापरले जाणारे घटक आरोग्यासाठी अधिक धोकादायक असतात त्यामुळे भजी किंवा तळलेले पदार्थ वर्तमानपत्रांच्या कागदातून बांधून दिले असतील तर हे खाताना काळजी घ्यावी.