केंद्र सरकारने लोकप्रिय ऑनलाइन बॅटल गेम पबजीवर बंदी घातली आहे. भारतातील तरुणांमध्ये हा गेम प्रचंड लोकप्रिय होता, गेम बॅन झाल्यामुळे पबजीच्या अनेक चाहत्यांना दुःख अनावर झालंय. सोशल मीडियावर सध्या अशाच दुःखी पबजी गेमर्सचा ‘मूड’ सांगणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 35 सेकंदाच्या या व्हिडिओत पबजी खेळाडूंनी या गेमची चक्क अंत्ययात्रा काढल्याचं दिसतंय. पबजी बॅन झाल्यामुळे पबजी गेमच्या फोटोवर फुलांचा हार चढवून हे खेळाडू अंत्ययात्रेदरम्यान ‘राम-राम सत्य है’च्या ऐवजी ‘विनर-विनर चिकन डिनर’ (Winner winner chicken dinner)बोलत आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये सगळे पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसतायेत. सर्वजण रडण्याचा अभिनय करत ‘विनर-विनर चिकन डिनर’ असं बोलत आहेत. कारण या गेममध्ये विजेत्याला बक्षिस म्हणून ‘चिकन डिनर’ मिळत असतो. व्हिडिओमध्ये त्यांच्यातील एक तरुण, ‘कालपर्यंत तर धडधाकट होता…आज अचानक काय झालं कळत नाही..’ असं म्हणत मुद्दाम रडण्याचं नाटक करताना दिसत आहे. तर दुसरा एक तरुण पबजी गेममुळे प्रेयसी सोडून गेल्याचं सांगत रडत आहे. काही दिवसांपूर्वी पबजीवरील बंदीमुळे रडणाऱ्या एका लहानग्या मराठी मुलाचा व्हिडिओही बराच व्हायरल झाला होता.

बघा व्हायरल झालेले दोन्ही व्हिडिओ –


दरम्यान, भारत आणि चीनमध्ये सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव PUBG सह 118 चिनी मोबाइल अॅप्स बॅन केले आहेत. त्यानंतर पबजी गेम खेळणाऱ्यांचे चांगलेत वांदे झालेत. अशात पबजी खेळणाऱ्यांची व्यथा मांडणारा हा अंत्ययात्रेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.