व्यवसाय करायचा म्हणजे काही साधी गोष्ट नाही. व्यवसाय म्हणजे २४ तासांची नोकरीच झाली असं आपण नेहमी म्हणतो. हे काही अंशी खरं असलं तरी त्यातून मिळणारं समाधान काही वेगळंच आहे. म्हणूनच ९ ते ५ च्या नोकरीत अडकून पडण्यापेक्षा यशस्वी उद्योजिका होण्याचं ज्या महिला स्वप्न पाहतात त्यांच्यासाठी ‘मेलकॉन’च्या संचालिका मानसी बिडकर यांनी सांगितलाय यशाचा मंत्र, जो प्रत्येक उद्योजिकेला नक्कीच मागर्दशनपर ठरेल..

एखाद्या महिलेनं ठरवलं की आपण काहीतरी करायचं तर तिचा साधारण प्रवास सुरू व्हायला, निर्णय घ्यायला, सगळा विचार करायला बराच वेळ निघून जातो. महिला त्यातून त्या एखादा व्यवसाय करणार म्हणजे तितकीच भक्कम ‘सपोर्ट सिस्टम’ तिच्या पाठीशी असायला हवी किंवा तिनं ती उभी करायला हवी. तिनं मल्टीटास्कर तर असायलाच हवं पण त्याचबरोबर जिद्द, चिकाटी हे गुणही तिच्यात असणं गरजेच आहे. एखादी गोष्ट सहजतेनं जमली नाही तर त्याचा पाठवपुरावा तिनं करायला हवा. महिला जेव्हा व्यवसायात उतरतात तेव्हा अनेकदा त्यांना अनेक संकटांचा समान करावा लागतो. एखाद्या पदार्थ विक्रीचा व्यवसाय करायचा म्हटलं की तिच्या डोळ्यासमोर मसाले, पापड आणि लोणची याशिवाय काही दुसरे पर्याय येत नाही. पण यापलीकडे तिनं विचार करायला हवा किंवा हेच पदार्थ घेऊन ती व्यवसायात उतरली तर तिने वेगळ्या पद्धतीनं ते सादर करायला हवे. आपला ब्रँड तयार करायला हवा.

जेव्हा आपण एखादं उत्पादन काढायचं ठरवतो तेव्हा आपण त्याच्याबद्दल सगळी माहिती शोधून काढतो. ते उत्पादन तयार करण्यासाठी जी काही मेहनत घ्यावी लागते ती आपण घेतो. पण हे उत्पादन तयार झाल्यानंतर ते सादर कसं करावं, त्याचं विपणन/ मार्केटिंग आणि जाहिरात कशी करावी? याचाही विचार प्रत्येक महिलेनं करायला हवा. दुर्देवानं ते होताना दिसून येत नाही. जसं आपण एखाद्या उत्पादनात गुंतवणूक करतो तशीच आपल्या उत्पादनाचं मार्केटिंग करण्यातही आपण पैसे खर्च केले पाहिजे. आपल्या उत्पादनाचं मार्केटिंग करणं म्हणजे अतिरिक्त खर्च आपण करत आहोत अशी भावना मनात न आणता आपण एकप्रकारे गुंतवणूकच करत आहोत असा विचार प्रत्येकीनं केला तरच तुमच्याच कंपनीला फायदा होणार आहे हे प्रत्येकीनं लक्षात ठेवायला हवं.

भविष्यात कोणत्याही व्यवसायाचा पाया हे उत्पादन म्हणजे प्रोडक्शन नसून मार्केटिंग असणार आहे हा विचार प्रत्येक महिला उद्योजिकेनं लक्षात घेतलं पाहिजे. व्यवसायात ‘every problem is an opportunity’ म्हणजे प्रत्येक संकट काहीतरी नवं करून दाखवण्याची संधी असते असं म्हणतात. हिच संधी काहीवर्षांपूर्वी ‘ओला’ कॅब सेवा सुरू करणाऱ्या तरुणानं हेरली आणि व्यवसायात आपला पाय रोवला. त्यामुळे प्रत्येकीनं आपल्या व्यवसायाचा युएसपी म्हणजे युनिक सेलिंग पॉईंट काय आहे ठरवलं पाहिजे. या जोरावर त्या नक्कीच आपला व्यवसाय वाढवू शकतील.
त्याचबरोबर कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणजे ग्राहकांच्या समाधानावरही विशेष लक्ष दिलं पाहिजे. आपलं उत्पादन विक्रीसाठी ठेवताना त्याच्या पॅकेजिंगवरही तितकाच भर असला पाहिजे कारण पॅकेजिंग जितकं आकर्षक आणि टिकाऊ तितकंच उत्पादनाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही वेगळा असतो. आपण व्यवसायात उतरताना एक गोष्ट मनाशी पक्की करायची ती म्हणजे आपल्या उत्पादनात कधीही तडजोड करायची नाही. अडचणी कितीही आल्या तरी उत्पादनाच्या गुणवत्तेच तडजोड करायची नाही हे प्रत्येकीनं लक्षात ठेवलं पाहिजे.

या सगळ्यानंतर जाहिरातबाजीवरही लक्ष केंद्रीत करता प्रत्येक महिलेला आलं पाहिजं. जाहिरात म्हणजे एखादा संदेश, आपली वस्तू किंवा सेवा समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची कला आहे. ही कला आपल्या व्यवसाय वाढीसाठी प्रत्येकीला अवगत करता आली पाहिजे. अनेकांना जाहिरातबाजी म्हणजे नाकापेक्षा मोती जड असं वाटतं, पण जाहिरातबाजी जितकी अधिक तितकाच आपला ब्रँड लोकापर्यंत पोहोचण्याची शक्याता अधिक वाढते. यामुळे आपला व्यवसाय तर वाढतोच पण बाजारपेठेत आपली ओळखही निर्माण होते.

मार्केटिंग हा देखील व्यवसायतला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपलं उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचवून त्याची उपयुक्ततता पटवणं, ग्राहकांकडून ऑर्डर मिळवणं हे या कलेचं यश आहे. यासाठी डिजिटल मीडियाचाही वापर करता आला पाहिजे तुमच्यासमोर असलेल्या १० व्यक्तींपैकी प्रत्येक व्यक्ती तुमचं उत्पादन खरेदी करेलच असं नाही, त्यातल्या क्वचितच दोन ग्राहकांना तुमचं उत्पादन खरेदी करण्यात रस असतो. त्यामुळे व्यवसायात उतरताना प्रत्यक्षात किती मेहनत घ्यावी लागणार आहे याचा विचार प्रत्येकीनं करायला हवा. या सर्व गोष्टी योग्यरित्या जुळल्या की व्यवसायात तुमची पकड मजबूत झालीच म्हणून समजा.