News Flash

World Sleep Day: …म्हणून झोपेचे मानसशास्त्र समजून घेणे महत्वाचे ठरते!

स्वप्न म्हणजे अचेतन मनाची एक झलक किंवा अचेतन मनातील घटकांची जागरूक मनात झालेली घुसखोरी.

झोपेचे मानसशास्त्र

डॉ. अनुपम बोराडे

झोप नेमकी किती घ्यावी, ती घेताना आपल्याला स्वप्नं का पडतात, त्यांचा अर्थ काय असतो, काही लोकांना अजिबात झोप का येत नाही, अशा अनेक प्रश्नांमधून झोपेचं मानसशास्त्र उलगडता येतं.

‘बंडय़ा ऊठ! झोपतोस काय लेका.’ बहुतांश घरांमध्ये पिढय़ान् पिढय़ा वडीलधाऱ्यांच्या तोंडी असलेले हे शब्द माझ्याही नशिबात होतेच. लहानपणी झोपेसारखं सुख आणखी कशातच नाही असं वाटायचं. परंतु वडीलधाऱ्यांकडून होणारी आमच्या झोपेची अवहेलना आणि आमचं झोपेवरचं प्रेम यांचं घनघोर युद्ध मनात सुरू असायचं. झोप नेमकी चांगली की वाईट याचा संभ्रम वाटायचा. त्यातच परीक्षा आल्या की पहाटे उठावं लागायचं. पहाटेची साखरझोप म्हणजे सिनेमातील सर्वात महत्त्वाचा असा क्लायमॅक्सचा टप्पा. तिचा त्याग करायचा तरी कसा? बंदिवानांवर जे क्रूर अत्याचार केले जातात त्यांपैकीच हादेखील एक असावा अशी माझी समजूत दृढ झाली होती. तेथे आज झोपेच्या विषयावर एखाद्या मासिकावर विशेषांक वगैरे होऊ शकतो, असं बालपणी स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं.

प्राचीन काळात काही राजदरबारी काही विशेषज्ज्ञ असायचे. त्याच्यासाठी वेगळे महाल बांधले जायचे. त्यांचं काम काय, तर झोपायचं, स्वप्नं पाहायची, त्याचा अर्थ लावायचा आणि राजाला सांगायचं. मग राज्याच्या पुढील वाटचालीत त्या स्वप्नांचा अर्थ लावायला मदत होत असे. म्हणजेच एके काळी या झोपाळूंना राजाश्रय होता तर!

झोप म्हणजे नेमकं काय हे अद्याप संपूर्णपणे समजलेलं नाही. किंबहुना ब्रह्मांडाचा अंत शोधावा तसं गूढातून आणखी गूढ निर्माण व्हावं अशी काहीशी ही अवस्था आहे. थोडक्यात मेंदूच्या पेशींनी घेतलेली ‘टाइम प्लीज’ असं म्हणता येईल.

पण खरोखरच या पेशी आराम करतात का? मग स्वप्नं कशी पडतात? गूढ! आज आपण थोडं या गूढाचं आकलन करण्याचा प्रयत्न करू. नजीकच्या काळात सिग्मंड फ्रॉइड या मेंदुविकारतज्ज्ञाने मानवी मनाचा अभ्यास केला. स्वप्न या विषयावर ग्रंथ लिहिले. त्याचा ‘इंटरप्रेटेशन ऑफ ड्रीम्स’ बराच चच्रेत राहिला व अजूनही अभ्यासाचा विषय आहे. फ्रॉइडने उपचार केलेली ‘अ‍ॅना ओ’ची केस आणि तत्सम अनेक रुग्णांचा अभ्यास व उपचार जगापुढे मांडला व अभ्यासकांमध्ये धुमाकूळ घातला. त्यातून निर्माण झालेली संकल्पना म्हणजे टोपोग्राफिकल स्ट्रक्चर ऑफ माइंड (१९०५). मन कुठं आहे हा विचार करण्यापेक्षा मन कसं आहे याचा अभ्यास त्यातून सुरू झाला. स्वप्नं का पडतात, त्याची रचना कशी होते, हे फ्रॉइडने स्ट्रक्चर ऑफ माइंडच्या आधारे समजावण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वी झाला.

एका हिमनगाशी तुलना करून फ्रॉइडने मनाच्या विविध भागांचं वर्णन केलं. मनुष्याचे विचार, भावना, मानसिकता समजण्यास, मनाच्या अशा वर्णनातून मदत होऊ शकते. फ्रॉइडच्या मांडणीनुसार दैनंदिन जीवनात मनााच्या ज्या भागामध्ये विचार येतात ते जागरूक मन (कॉन्शिअस माइंड)असतं. हा हिमनगाचा एकअष्टमांश दृश्य भाग. त्याखालचा भाग म्हणजे अचेतन मन (अनकॉन्शिअस माइंड), म्हणजेच अदृश्य भाग. या अदृश्य भागात अनेक तीव्र इच्छा, भावना, लैंगिक मनीषा, घृणास्पद अनुभव, हिंस्र इच्छा इ. अनेक बाबी दडून बसलेल्या असतात. त्यांची तीव्रता इतकी विलक्षण असते की त्यांचे जागरूक मनात येणं घातक ठरू शकतं. त्यामुळे मन त्यांना अचेतन मनाच्या तळघरात डांबून ठेवतं. आपलं वागणं, आवड-निवड अशा तळघरात डांबून ठेवलेल्या विचारांच्या तीव्रतेवरही अवलंबून असतं.

माणसाच्या मनामध्ये एक मानसिक यंत्रणा कार्यरत असते, त्याला सायकिक अ‍ॅपॅरट्स म्हणतात. मनाच्या उलाढाली या यंत्रणेद्वारे होत असतात. इड (id), इगो (ego) आणि सुपरइगो (superego) असे या यंत्रणेचे भाग आहेत. यातील इगो म्हणजे आपल्या बोलीभाषेतील इगो नव्हे. इडमध्ये प्रचंड ऊर्जा असलेल्या इच्छा असतात. सुपरइगो म्हणजे सामाजिक आणि आंतरिक भान ठेवून बनवलेली नियमावली. आणि इगो म्हणजे या दोघांचा समन्वय घडवून आणणारी यंत्रणा. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मनस्वरूपी घरात तीन जणांचं कुटुंब राहत असतं. त्यातील इड असतो धाकटय़ा भावासारखा- हट्टी, हवं ते लगेच मागणारा. सुपरइगो असतो एका थोरल्या बहिणीसारखा- शिस्तबद्ध, नियमप्रेमी. दोघांचं एकमेकांशी न पटण्यासारखं नातं आहे.

इगो असतो एका समंजस पालकासारखा. उदाहरणार्थ, इड म्हणतो आईसक्रीम हवंय. सुपरइगो म्हणतो वर्ग सुरू असताना काहीही खाऊ नये. दोघांचं द्वंद्व टाळण्यासाठी इगो मध्यस्ती करतो. म्हणतो, वर्ग संपला की लगेचच आईसक्रीम खाऊ. दोन्ही मुलं खूश.

अशा उलाढाली मनात घडत असतात. आता याचा स्वप्नांशी काय संबंध?

स्वप्न म्हणजे अचेतन मनाची एक झलक किंवा अचेतन मनातील घटकांची जागरूक मनात झालेली घुसखोरी.

स्वप्नात दिसणाऱ्या बऱ्याच गोष्टी समजण्यास अवघड असतात. त्यातील वैचित्र्यामुळे त्याचा नेमका अर्थ उमजत नाही. असं का घडतं ते समजून घेऊ.

अचेतन मनामध्ये अशा असंख्य इच्छा, भावना, अनुभव, स्मृती इ. असतात. त्यांच्यात प्रचंड मानसिक ऊर्जा असते. मुळात त्याच्यात असलेली अशांतता मनुष्यासाठी घातक ठरू नये यासाठीच त्यांची रवानगी अचेतन मनाच्या तळघरात केलेली असते. परंतु हे घटक तिथंही शांत बसत नाहीत. सतत जागरूक मनात येण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांना जागरूक मनात आणून त्यांची तीव्रता थोडीफार कमी करण्याचा मार्ग म्हणजे स्वप्न.

ड्रीम वर्क – अचेतन मनातील अशा चंचल घटकांना जागरूक मनात काही काळासाठी फेरफटका मारण्याची परवानगी दिली जाते. परंतु त्यापूर्वी त्यांची चांगली ‘तयारी’ करावी लागते. त्यांना जणू वेगळा पेहराव, वेगळा मेकअप आणि जागरूक मनास साजेसा एक लुक द्यावा लागतो. जसे परदेशात जाताना, त्या देशातील संस्कृतीप्रमाणे पेहराव आवश्यक असतो, त्याप्रमाणे या अशांत घटकांचा थोडा कायापालट केला जातो. त्याशिवाय त्यांना ‘व्हिसा’ मिळत नाही. या अशा घटकांना पाहणं म्हणजे स्वप्न. काही काळापुरतं त्यांना अभय दिल्यामुळे त्यांना पाहावंच लागतं. त्यांचा पेहराव त्यातल्या त्यात सुसह्य़ असल्यामुळे आपली झोपमोड होत नाही.

उदाहरणार्थ, समजा एखाद्याला त्याच्या बॉसबद्दल अत्यंत राग आहे. त्या बॉसला चाबकाचे फटके द्यावेत अशी तीव्र इच्छा मनात निर्माण झाली. परंतु सामाजिक भान व वरिष्ठांचा आदर राखण्याचे संस्कार, यामुळे चाबकाचे फटके देण्याचा विचार जागरूक मन टिकू देत नाही व त्या इच्छेची रवानगी अचेतन मनात केली जाते. किंबहुना त्या व्यक्तीस, ही आपल्याच मनातील इच्छा आहे हेदेखील आठवत नाही. परंतु प्रचंड ऊर्जा असलेली ही इच्छा, स्वप्नावाटे वेश पालटून जागरूक मनात येते. त्या व्यक्तीस असं स्वप्न पडतं की, तो एका अवाढव्य हत्तीसमोर उभा आहे व त्या हत्तीस चाबकाचे फटके मारत आहे. अनेक दिवस तळघरात धुमाकूळ घालणाऱ्या इच्छेस जागरूक मनात जाण्यासाठी एक दरवाजा यानिमित्ताने मिळतो.

अशा पद्धतीने सुप्त घटकांना प्रतीकात्मक स्वरूपात जागरूक मनात आणून त्यांची तीव्रता कमी करणं म्हणजेच ड्रीम वर्क. काही अभ्यासकांनी तर स्वप्न शब्दकोश तयार केला. म्हणजे स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टीचा नेमका अर्थ काय याचं विश्लेषण.

स्वप्नांसारखीच आणखी चमत्कारिक अवस्था म्हणजे झोपेत असताना झालेल्या शारीरिक हालचाली, उदाहरणार्थ, चालणं, बोलणं, किंकाळी फोडणं इत्यादी.

स्वप्न पाहणारा, प्रत्यक्षात स्वप्न जगू लागतो, म्हणजेच ड्रीमर अ‍ॅक्टिंग आऊट अ ड्रीम. महत्त्वाची बाब म्हणजे जाग आल्यानंतर त्याला या झालेल्या प्रकारची जाणीव नसते. झोपेत चालणाऱ्यांचे डोळे अर्धे मिटलेले असतात. भावनाहीन चेहरा, सरळ नजर व चालताना हाताच्या कमीत कमी हालचाली अशी काही त्याची लक्षणं असतात.

१८४७ साली अमिना नावाच्या तरुणीची कहाणी खूप चच्रेत आली. अमिना ही झोपेत चालत असे. आणि जागेपणी तिला याची कल्पनादेखील नसायची. १६१५ मध्ये डॉन क्विझॉट हे चित्र गाजलं. त्यात क्विझॉट झोपेत असताना, पलंगावरून उठून, तलवार हातात घेऊन एका अवाढव्य दानवाशी झुंज दिल्यासारखे हातवारे करताना दिसतो. अशा अवस्थेतून कोणालाही गंभीर दुखापत होऊ शकते.

पुढे मेंदूतील विद्युत लहरी टिपणाऱ्या उपकरणाचा शोध लागला व अभ्यासाला नवी दिशा मिळाली. ईईजी म्हणजे इलेक्ट्रो एन्सेफला ग्राफ – मेंदूतील आंतरिक संवाद लहरींच्या स्वरूपात मांडून सद्य अवस्था समजण्यास यामुळे मदत होऊ लागली.

नॉन रॅपिड आय मूव्हमेन्ट (एनआरईएम) स्लीप, रॅपिड आय मूव्हमेंट (आरईएम) स्लीप असे झोपेचे विभाजन झाले. स्वप्न व स्वप्न पाहात असताना घडलेल्या हालचाली या आरईएम स्लीपमध्ये घडतात. त्यांना आरईएम स्लीप बिव्हेविअर डिसऑर्डर (आरबीडी) असे म्हणतात. तुलनेने एनआरईएममध्ये फारसे डिसऑर्डर नसतात.

हल्ली झोपेच्या तक्रारी वाढल्याचे अनेकवेळा पाहायला मिळते. पण झोपेच्या तक्रारी हे मनातील गुंतागुंतीचे बाह्य़ स्वरूप असते. आतमध्ये काय दडलंय हे पाहणे गरजेचे आहे. एखाद्यास ताप आला तर ताप हे बाह्य़ दृश्य असते, पण आतमध्ये कोठेतरी इन्फेक्शन झालेले असते. पण तापावर गोळी देऊन तो दूर करता येतो तसे केवळ झोपेच्या गोळ्या घेऊन झोपेची तक्रार दूर होते असे समजणे चुकीचे ठरेल. कारण अनेक मानसिक आजारांचे बाह्य़ स्वरूप हे झोपेच्या तक्रारी असू शकतात. अशा आजारांची यादी खूप मोठी आहे. त्यामुळे बहुतांश वेळा रुग्ण झोपेची तक्रार घेऊन येतो तेव्हा त्यामागील मूळ मानसिक आजार काय आहे हेच आधी पटवून द्यावे लागते. कारण मी उदास आहे, मला नैराश्य आलं आहे, घरातील काही वातावरणामुळे मला मानसिक त्रास होतोय अशी तक्रार घेऊन येण्यापेक्षा झोप येत नाही अशी तक्रार घेऊन येण्याचे प्रमाण तुलनेने अधिक असते. पण मानसिक बदल आधी झालेला असतो आणि मग झोप बिघडलेली असते.

झोपेच्या तक्रारी या काही प्रमाणात शारीरिक व्याधींमुळेदेखील असू शकतात. म्हणजे मधुमेह असेल तर त्या व्यक्तीला अनेक वेळा लघवीला जावे लागत असल्याने झोपेची तक्रार असू शकते.

झोपेची तक्रार कोणालाही होऊ शकते. मग तो उच्चभ्रू असो की अगदी रस्त्यावर राहणारा एखादा. दोन्ही ठिकाणी ताण-तणाव हे असतातच. त्या ताणतणावांना सामोरे जाण्याची त्यांची मानसिक शक्ती जशी प्रतिसाद देते त्यावर त्याचे परिणाम होत असतात.

झोप कमी होण्यामध्ये नैराश्याचा भागदेखील असतो. नैराश्यामध्ये, रुग्ण झोपलेला आढळू शकतो. परंतु त्याला उठल्यानंतर पुरेशी झोप मिळाली नाही असं वाटतं. किंबहुना, घरातल्या इतर मंडळींचे म्हणणे असते, ‘नुसता झोपा काढतो’. खरं तर त्याला मिळणाऱ्या झोपेची क्वालिटी कमी असते. एनआरईएम आणि आरईएम झोपेच्या क्रमामध्ये झालेले बदल त्याला चांगल्या दर्जाची झोप मिळू देत नाही. मानसिक ताण, असंख्य विचार, नकारात्मक भावना त्यांचा परिणाम झोपेच्या दर्जावर होतो.

बाय पोलार डिसऑर्डरमध्ये रुग्ण केवळ काही तासच झोपतो. बाय पोलार मॅनिया म्हणजे उन्मादवस्था. या आजारात रुग्ण अत्यंत आनंदी, अतिउत्साही, बडबड करणारा मोठय़ा गप्पा माणारा असतो. तसेच त्याला झोपेची गरज कमी भासते. केवळ तीन-चार तास झोपून हे रुग्ण बाकी वेळेस अगदी फ्रेश दिसतात.

परंतु त्या फ्रेश काळात त्यांच्या हातून बरीच घातक कृत्ये घडू शकतात. आनंदाच्या भरात आपली संपत्ती दान करणे, उत्साही स्थिती असल्यामुळे नको त्या ठिकाणी मोठय़ाने गाणे, गुणगुणणे, नाचणे इ. त्याच्यानुसार झोप म्हणजे ‘वेस्ट ऑफ टाइम’.

बायपोलारमध्ये दोन टोकं गाठली जातात. वर सांगितलेली अवस्था जर एक टोक असेल तर दुसरे टोक म्हणजे उदासीनता असते. पण या अवस्थेत तो या टोकाकडून दुसऱ्या टोकाला कधी जाईल सांगता येत नाही. त्यामुळे वरकरणी ती व्यक्ती सुधारली असे वाटले तरी तसे नसून ती दुसऱ्या टोकाला गेलेली असते. मग या कमी झोपेचे दुष्परिणाम शरीरावर दिसू लागतात.

आजच्या स्पर्धात्मक युगात आपलं सर्वच ताळतंत्र बिघडलं आहे. ताणतणाव तर प्रत्येकाच्याच मागे लागलेले आहेत. आणि आपल्या प्राथमिकता बदलल्या आहेत. अशा वेळी आपणच आपल्याला प्रश्न विचारायला हवा की, आपल्याला निरोगी आयुष्य हवंय की अनेक व्याधी. या प्रश्नाचं उत्तर निरोगी आयुष्य असेल तर मग आपल्याला त्यानुसार आपल्यामध्ये बदल करावा लागेल.

तर अशीही निद्रादेवी. काहींवर प्रसन्न होते, तर काहींकडे दुर्लक्ष करते. परंतु तिची आराधना सर्वानाचा करावी लागते. क्वालिटी स्लीप आणि स्वस्थ मन यांची सांगड घातल्यास एकमेकांस पूरक असलेले हे आवश्यक घटक, आपल्या आयुष्याचा दर्जा सकारात्मकरीत्या उंचावण्यास मदत होईल.

झोपेसाठीची पथ्यं

झोप सुरळीत होण्यासाठी काही पथ्यं पाळलीत तर उत्तम. या पथ्यांना स्लीप हायजीन म्हटलं जातं.

* सकाळी जागं होण्याची वेळ निश्चित करावी आणि त्या वेळीच उठावं. त्या वेळी कितीही झोपावंसं वाटत असेल तरीही अंथरुणात पडून राहू नये.

*  दिवसा झोप घेणं शक्यतो टाळावं.

*  संध्याकाळनंतर चहा, कॉफी, चॉकलेट, कोको बिस्कीट इत्यादी पेय व पदार्थ खाणं, पिणं टाळावं. तंबाखू, मिश्री, सिगारेट व तत्सम उत्तेजक पदार्थाचं सेवन तात्काळ थांबवावं. मद्यप्राशनाने झोपेचा क्रम बदलून निद्रानाशाचा त्रास संभवतो.

*  रात्रीच्या जेवणात तिखट, तेलकट, तळलेले पदार्थ टाळावेत. शक्यतो नैसर्गिक आहार घ्यावा.

*  पलंग किंवा अंथरुण केवळ झोपेसाठीच वापरावं. झोप येत नसेल तर आडवे पडून विचार करत बसू नये किंवा जबरदस्तीने झोप आणण्याचा प्रयत्न करू नये. त्या वेळी झोपेची जागा सोडून घरात हॉलमध्ये खुर्चीवर बसावं. झोप येत आहे असं वाटल्यास पलंगावर झोपण्यास जावं.

*  पलंग किंवा झोपेची जागा वाचन करण्यासाठी, मोबाइल पाहण्यासाठी वापरू नये.

*  झोपायच्या खोलीत कमीत कमी प्रकाश आणि कमीत कमी आवाज असावा.

* योगाचे प्रशिक्षकांकडून घेतलेले प्रशिक्षणदेखील झोपेसाठी उपयोगी ठरते. (वाचून केलेला योगा योग्य नाही.)

स्लीप हायजीनची पथ्यं पाळल्यास झोपेच्या तक्रारी कमी होतात.  आपल्या शरीराला त्या प्रकारे प्रशिक्षण मिळाल्यावर अंथरुणात पडल्यापडल्या उत्तम झोपेचा (क्वालिटी स्लीप) आनंद घेता येतो.

response.lokprabha@expressindia.com

(मूळ लेख २८ सप्टेंबर २०१८ रोजी ‘लोकप्रभा’मध्ये प्रकाशित झाला आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2019 8:19 am

Web Title: world sleep day understating the sleep psychology
Next Stories
1 World Sleep Day: झोप म्हणजे काय?, ती कशी येते? जाणून घ्या झोपेसंदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे
2 अक्रोड खाणे चयापचय प्रक्रियेसाठी उपकारक
3 होली है…
Just Now!
X