‘शाओमी’चा महागडा फोन अशी ओळख असलेला तब्बल 108MP कॅमेऱ्याचा फोन Xiaomi Mi 10 च्या किंमतीत कपात झालीये. लाँच झाल्यापासून पहिल्यांदाच कंपनीने अधिकृतपणे या फोनच्या किंमतीत कपात केली आहे. या फोनच्या किंमतीत आजपासून 300 युआन म्हणजे जवळपास 3100 रुपये कपात झाली आहे. मात्र, ही कपात भारतासाठी नाहीये. चीनमधील मार्केटमध्ये या फोनची किंमत कमी झाली आहे. भारतात हा फोन गेल्या महिन्यातच लाँच झाला आहे. कंपनीने चीनमध्ये या फोनच्या किंमतीत कपात केल्यामुळे भारतातही लवकरच किंमतीत कपात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Xiaomi Mi 10 या फोनमध्ये केवळ कॅमेरा नव्हे तर 3D कर्व्ह्ड डिस्प्ले आणि लेटेस्ट क्वॉलकॉम प्रोसेसरही आहे. हा स्मार्टफोन कंपनीने 5G कनेक्टिव्हिटी सपोर्टसह लाँच केला आहे. फोनमध्ये 6.67-इंचाचा फुल-एचडी+ (1080 x 2340 पिक्सल) डिस्प्ले आहे. यात ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप म्हणजेच मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 8के व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्टसह तब्बल 108 मेगापिक्सलचा आहे. तर, अन्य तीन कॅमेरे 13, 2 आणि 2 मेगापिक्सलचे आहेत. तसेच ड्युअल एलईडी फ्लॅशदेखील आहे. याशिवाय फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,780 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी कंपनीने दिलीये.

भारतात Mi 10 ची किंमत :-
कंपनीकडून Mi 10 हा फोन भारतात 31 मार्च रोजी लॉन्च केला जाणार होता. पण, करोना व्हायरसमुळे लॉकडाउन जाहीर झाल्याने या फोनची लॉन्चिंग तारिख पुढे ढकलण्यात आली होती. अखेर गेल्या महिन्यात भारतात हा फोन दोन स्टोरेजमध्ये उपलब्ध करण्यात आला. यातील 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 49 हजार 999 रुपये आहे. तर, 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 54 हजार 999 रुपये आहे. याशिवाय स्मार्टफोनसाठी प्री ऑर्डर करणाऱ्यांना कंपनीकडून 2500 रुपयांचा वायरलेस चार्जर फ्री दिला जात आहे.