Vaginal Stone Size Of Orange: डॉक्टरांनी एका २७ वर्षीय तरुणीच्या पेल्विक अवयवांमधून एक व्हजायनल स्टोन (योनी मार्गातील खडा ) काढल्याची आश्चर्यकारक घटना समोर येत आहे. ही अत्यंत दुर्मिळ स्थिती असून जेव्हा लघवी योनीमध्ये साचत जाऊन त्यामुळे कडक क्रिस्टल्स (खडे) तयार होतात तेव्हा ही स्थिती उद्भवते. सहसा योनिमार्गात बॅक्टेरियामुळे झालेल्या संसर्गावर उपचार न केल्यास हा धोका बळावू शकतो. बॅक्टेरिया लघवीतील रसायनांवर प्रतिक्रिया देतात ज्यामुळे द्रव घट्ट होऊ लागते. विशेषतः आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तीला हा त्रास होण्याची शक्यता असते, कारण अशा स्थितीत जिवाणू आणि मूत्र योनीमध्ये जास्त काळ राहण्याची शक्यता असते.

द सनच्या माहितीनुसार, या २७ वर्षीय महिलेला असहाय्य पोटदुखी जाणवत असल्याने तिने आपत्कालीन विभागात धाव घेतली. वेदनांसह तिला उलट्या होत होत्या. मध्येच गरम होणे व अचानक थंडी भरून येणे हे ही त्रास तिला जाणवत होते. महिलेची तपासणी केली असता, डॉक्टरांना संत्र्याइतका मोठा दगड महिलेच्या योनीमार्गात आढळून आला. त्यानंतर डॉक्टरांना दगड काढण्यासाठी लेजरच्या सहाय्याने तीन तासांची परिश्रमपूर्वक प्रक्रिया करावी लागली.

योनिमार्गात खडे का तयार होतात?

मेडिकल जर्नलमधील युरॉलॉजी केस रिपोर्ट्सनुसार, योनीमार्गात तयार होणारे खडे हे मुतखड्याप्रमाणेच असतात. हे खडे मुख्यतः ७० टक्के struvaite आणि ३० टक्के apatite ने बनलेले असतात. जिवाणूंच्या शरीरातून बाहेर पडणारे हे टाकाऊ घटक लघवीला कमी अल्कलाईन करतात. ही दुर्मिळ स्थिती असून आजवरच्या वैद्यकीय रेकॉर्ड्समध्ये याची जवळपास १०० प्रकरणे नोंदवलेली आहेत.

योनीमार्गात खडे होण्याची चिन्हे व लक्षणे

योनीमार्गात खडे झाल्यावर दिसणारी चिन्हे व लक्षणे ही कमी- अधिक प्रमाणात योनीमार्गातील संसर्गाप्रमाणेच (UTI) असतात. जसे की,

१) घाईने लघवीला जावे लागणे
२) सतत लघवीला जावे लागणे
३) योनीमार्गात वेदना
४) पोटदुखी
५) सेक्स करताना प्रचंड वेदना होणे
६) संसर्गामुळे ताप येणे
७) फेसाळ लघवी

हे ही वाचा<< ‘झिम्मा २’ मधील लाडक्या पात्राला पार्किनसन्स होताच.. पण ‘हा’ आजार नेमका आहे काय? उपचार, लक्षणे व परिणाम वाचा

योनीमार्गातील खड्यांवर काय उपचार आहेत?

निदान झाल्यावर योनीमार्गातील खड्यांवर उपचार करण्यासाठी लेजरने केली जाणारी शस्त्रक्रिया सर्वात सोयीस्कर उपचार ठरू शकते. मुतखड्यांप्रमाणे हे खडे तोडले जातात. हेच खडे लघवीवाटे बाहेर टाकताना वेदना होऊ शकतात पण याने सहसा दीर्घकालीन नुकसान होत नाही. खबरदारी बाळगून वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसत असल्यास वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्या)