Hair Growth Oil: अलीकडे केस गळतीचा त्रास इतका कॉमन झाला आहे की लहान मुलांमध्येही यावेळी टक्कल पडणे हा त्रास दिसून येतो. पण आश्चर्य म्हणजे एरवी अन्य त्रास हे वयस्कर व्यक्तींना अधिक होत असल्याचे रेकॉर्ड असताना केसगळतीच्या बाबत मात्र आपल्या आज्या- आजोबा फारच लकी असतात. अजूनही त्यांचे केस छान दाट असतात. अर्थात याचं कारण म्हणजे योग्य वेळी त्यांनी केसाची निगा राखलेली असते. तेल लावून केस विंचरलेले असतात. अलीकडे बाजार अनेक प्रकारची तेलं आली आहेत. त्यातील काही उत्तमही आहेत पण त्यांचे भाव बघितले की आहेत ते केसच बरे असं वाटू शकतं. पण अगदी मोजकेच पैसे खर्च करून तुम्ही स्वतः घरी केसवाढीचे तेल बनवू शकता. यासाठी निदान पाच- दहा मिनिटांचा वेळ काढण्यासाठी तुम्ही तयार असायला हवं.
इंस्टाग्रामवर आहारतज्ज्ञ रिचा गांगणी यांनी ३० दिवसात २ इंच केस वाढणारच असा दावा करत एक तेल बनवण्याची प्रक्रिया शेअर केली आहे. आधी आपण ही प्रक्रिया काय आहे हे पाहूया आणि मग तज्ज्ञांनी याला किती गुण दिले आहेत ते ही जाणून घेऊया ..
३० दिवसात २ इंच केस वाढवणारे तेल कसे बनवायचे?
साहित्य
- १ वाटी – नारळाचे तेल
- १ – कांदा, कापून घ्या
- 1 – बाटली दुधी, ठेचून
- कडीपत्ता
- 2 चमचे – मेथी दाणे
- कलौंजी बिया किंवा तेल
- एरंडेल तेल
- 1 – व्हिटॅमिन ई कॅप्सूल
पद्धत
- एका भांड्यात खोबरेल तेल घाला.
- आता त्यात कांद्याचे तुकडे, कढीपत्ता, मेथीचे दाणे, कलौंजी बिया किंवा तेल, एरंडेल तेल, दुधीचा किस हे सर्व मिक्स करून उकळू द्या. तेलाचा रंग गडद झाल्यावर गॅस बंद करा.
- आता तेल थंड झाल्यावर गाळून घ्या आणि बाटलीत ठेवा.
- तयार केलेल्या द्रावणात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे लिक्विड घाला.
तेलाचा वापर कसा करावा?
आठवड्यातून दोनदा हे तेल डोक्याला लावू शकता. शॅम्पूच्या १-२ तास आधी लावा, ५ ते १० मिनिटे मसाज करा आणि केस झाकून ठेवा. हलक्या शाम्पूने धुवा.”
केसवाढीला घरगुती उपाय वापरावे का, तज्ज्ञांचं मत काय?
नानावटी मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील त्वचाशास्त्रज्ञ आणि ट्रायकोलॉजिस्ट डॉ वंदना पंजाबी यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, या तेलामध्ये दुधीचा किस वापरण्यात आला आहे. या दुधीमध्ये अनेक अत्यावश्यक अमीनो अॅसिड्स आणि जीवनसत्त्वे असतात आणि त्यात दाहक-विरोधी, अँटीऑक्सिडंट, लठ्ठपणा आणि कर्करोगविरोधी गुणधर्म असतात.
कलौंजीच्या बिया ज्याला ‘नायगेला सॅटिवा’ म्हणतात त्यात ‘थायमोक्विनोन’ नावाचा सक्रिय घटक असतो ज्यामध्ये प्रतिजैविक, दाहक-विरोधी आणि बुरशीविरोधी गुणसत्व असतात. म्हणूनच याचा उपयोग अनेक त्वचेच्या समस्या जसे की मुरुम, सोरायसिस, त्वचारोग आणि जखमेच्या दुरुस्तीसाठी केला जातो.
‘मुर्रया कोएनिगी’ या कढीपत्त्यात इम्युनोमोड्युलेटरी, अँटी-फंगल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात शिवाय मेथीच्या बिया तर औषधीच मानल्या जातात. या सगळ्याला एकत्रित करून तेल बनवणे हे किंबहुना, केस गळतीवर उपचार करण्यासाठी वनस्पतिजन्य अर्कांचा वापर फायदेशीर असू शकतो. मात्र हे अद्याप सिद्ध झालेले नाही.
हे ही वाचा<< रिकाम्या पोटी तूप खाताना अशी चूक कधीच करू नका! आयुर्वेदानुसार तूप कसं खावं? मिळतील अमृतासम फायदे
डॉ पंजाबी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये, असे निरीक्षण केले आहे की घरगुती उपचारांच्या वापरामुळे खाज सुटणे, पुरळ उठणे, त्वचा लाल होणे आणि कधीकधी कोंडा वाढून केस गळणे सुरू होते. त्यामुळे तुमच्या केसाच्या प्रकारानुसार एकदा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मग असे आयुर्वेदिक उपचार करणे उचित ठरेल.