Japanese Parenting Tips : पालकत्व हे निश्चितच खूप आव्हानात्मक काम आहे. प्रत्येक पालकांची मुलांना समजून घेण्याची, शिकवण्याची, संस्कार करण्याची पद्धत वेगळी असते. पण सर्वांचे ध्येय मात्र एक असते, ते म्हणजे मुलांना चांगला माणूस म्हणून घडवणे आणि भविष्यात यशस्वी होताना पाहणे. यासाठी अनेक पालक मुलांना लहानपणापासूनचं शिस्त लावत असतात, चांगल्या वाईट गोष्टींमधील फरक समजवून सांगतात. पण, यात जपानी पालकत्व पद्धत खूप अनोखी आहे, जी आजच्या घडीला खूप यशस्वीदेखील होत आहे. यामुळेच अनेक जपानी मुलं ही आयुष्यात खूप चांगल्याप्रकारे काम करताना दिसतात, कारण जपानी पालकत्व पद्धतीत मुलांना लहानपणापासूनच स्वावलंबन आणि शिस्तीचे गुण शिकवले जातात. त्यामुळे ही मुलं पुढे चांगला माणूस म्हणून तर घडतातच, शिवाय अनेक गोष्टीत यशस्वीदेखील होतात.
जपानी पालकांचा असा विश्वास आहे की, मुलांमध्ये जर तुम्ही लहानपणापासूनच योग्य सवयी आणि विचारसरणी रुजवली तर मूल प्रत्येक आव्हानाला तोंड देऊ शकते. पण, ही जपानी पालकत्व पद्धत नेमकी कशी आहे आणि ती मुलांना कशाप्रकारे शिकवायची याबाबत काही सोप्या टिप्स जाणून घेऊ…
१) स्वत:चे काम स्वत: करण्याची जबाबदारी
जपानमध्ये मुलांना लहानपणापासूनच स्वावलंबी राहण्यास शिकवले जाते. त्यांना स्वत:च्या गोष्टींची काळजी घेण्याची तसेच स्वत:च्या कामाची जबाबदारी घेण्याची सवय लावली जाते. अगदी लहानपणापासून त्यांना घर स्वच्छ करण्यापासून शाळा स्वच्छ करण्यापर्यंत सर्व काही स्वत: करावे लागते, त्यामुळे त्यांच्यात एक चांगला आत्मविश्वास आणि स्वावलंबन विकसित होते. हे गुण त्यांना भविष्यात मजबूत आणि यशस्वी माणूस बनण्यास मदत करतात.
२) अन्नाकडे विशेष लक्ष
जपानमधील मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यांना लहानपणापासून रोज निरोगी अन्न दिले जाते. शाळेतील जेवणातही त्यांना फक्त निरोगी अन्न खायला मिळते. यामुळे त्यांच्या मेंदूचा विकास होण्यास मदत होते आणि मुलं एकाग्रतेने त्यांच्या ध्येयांच्या दिशेने पाऊल टाकू शकतात.
३) सतत सुधारणा करण्याचे तत्व
जपानमध्ये कैझेन नावाचा एक सिद्धांत आहे, कैझेन म्हणजे लहान पावलं उचलून सतत सुधारणा करणे, ही जपानी संस्कृती लहान मुलांमध्ये खोलवर रुजवली जाते. जपानमध्ये मुलांना लहान वयापासूनच शिकवले जाते की, आयुष्यात मोठे बदल करण्यापेक्षा हळूहळू आणि सतत सुधारणा करूनचं खरे यश मिळवता येते. अभ्यास, खेळ किंवा कोणतेही वैयक्तिक कौशल्य असो, रोज यात थोडीशी सुधारणा करून जीवनात ध्येय गाठता येते.
४) इकिगाई पद्धत
इकिगाई ही एक जपानी संकल्पना आहे, ज्याचा अर्थ जगण्याचे कारण किंवा ध्येय असा होतो; ज्यात मुलांना त्यांना कोणत्या गोष्टी करण्यात आनंद मिळतो, ते कोणत्या कामात कुशल आहेत, जीवन जगण्यासाठी त्यांना कशाची गरज आहे, तसेच जगात त्यांना कोणती गोष्ट हवी आहे, याचा विचार करण्यास प्रोत्साहित केले जाते. जेव्हा हे चार मुद्दे एकत्र येतात तेव्हा जीवनाचे ध्येय आपोआप साध्य होते.