आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये कामाच्या ठिकाणाचे वातावरण अत्यंत वेगवान असते आणि नवनवीन मागण्या समोर ठेवल्या जातात. या मागण्या पूर्ण करताना कामाच्या ठिकाणी येणारा तणाव हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. डेडलाइन पूर्ण करण्यापासून ते वेगवेगळ्या स्वभावांच्या सहकाऱ्यांशी जमवून घेण्यापर्यंत, कामाशी संबंधित ताण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम करू शकतो. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी अलीकडच्या वर्षांत काही सोप्या पद्धतींनी लोकप्रियता मिळवली आहे आणि ते कामाच्या ठिकाणी विशेष प्रभावी ठरू शकतात.

काही सोप्या उपायांचा सराव करून तुम्ही कामाच्या ठिकाणी येणाऱ्या तणावाचे अधिक प्रभावीपणे व्यवस्थापन करू शकता आणि आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकता. आपल्या तणावाचे व्यवस्थापण करण्यासाठी आपल्याला आपले विचार, भावना आणि संवेदनांबद्दल निर्णय न घेता आणि परिस्थिती स्वीकारण्याची वृत्ती असणे आवश्यक आहे.

येथे काही सोप्या आणि व्यावहारिक पद्धती आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही कामाच्या ठिकाणी तणाव कमी करू शकता.

श्वासावर लक्ष केंद्रित करणे

ऑफिसच्या कामाचा ताण असेल तर आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी थोडा वेळ काढा. आपले डोळे बंद करा आणि आपले लक्ष आपल्या श्वासाकडे वळवा. तुमचा श्वास मंद करण्याचा प्रयत्न करा आणि खोल श्वास घ्या, प्रत्येक श्वास आत घेताना आणि सोडताना तुमचे पोट फुगवा आणि आत ओढा. यामुळे तुमचे मन शांत करण्यात आणि तणावाची पातळी कमी करण्यात मदत होऊ शकते.

हेही वाचा – बटाट्याचे फ्रेंच फ्राईज खाऊन कंटाळात? मग आता घरीच तयार करा रव्याचे फ्राईज, पाहा सोपी रेसिपी

मन लावून चालणे

तुम्हाला कामात दडपल्यासारखे वाटत असल्यास, थोडा ब्रेक घ्या आणि चालायला जा. तुम्ही चालत असताना, तुमच्या पायांचा जमिनीला होणाऱ्या स्पर्शाच्या संवेदना आणि तुमच्या शरीराच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या आसपासचा निसर्ग, आवाज आणि वास लक्षात घेऊन तुमच्या सभोवतालच्या परिसराचा आनंद घ्या. यामुळे तुम्हाला तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत होऊ शकते.

मन लावून खाणे

आपल्या डेस्कवर आपले दुपारचे जेवण पटपट खाण्याऐवजी, हळूहळू खाण्याचा सराव करण्यासाठी थोडा वेळ काढा. लहान घास घ्या आणि प्रत्येक घासाच्या चवीकडे लक्ष देऊन हळूहळू अन्न चावा. यामुळे तुम्हाला अन्नाचा आस्वाद घेण्यास आणि तणाव कमी करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत होऊ शकते.

हेही वाचा – आंबट-तिखट-गोड गोळवणी करा, भातासोबत त्यावर ताव मारा! ही घ्या विस्मृतीत चाललेल्या पदार्थाची रेसिपी

लक्षपूर्वक संवाद साधा

सहकाऱ्यांशी संवाद साधताना पूर्ण लक्ष देण्याचा सराव करा. ते काय म्हणत आहेत ते लक्षपूर्वक ऐका, व्यत्यय न आणता किंवा तुमच्या प्रतिसादाचा विचार न करता संभाषणावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा आणि मल्टीटास्किंग करणे किंवा तुमचा फोन तपासणे टाळा. तुमच्या परस्परसंवादात पूर्णपणे उपस्थित राहा, तुम्ही तणाव कमी करू शकाल आणि इतरांशी असलेल्या तुमच्या संबंधांत सुधारणा करू शकाल.

छोटा विश्रांती घ्या

कामाच्या ठिकाणी येणारा ताण टाळण्यासाठी दिवसभरात छोटी विश्रांती घ्या. काही मिनिटांसाठी टायमर सेट करा आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा किंवा फक्त शांत बसून तुमचे विचार आणि भावनांचे निरीक्षण करा. यामुळे तुम्हाला तुमचे मन शांत करण्यात आणि तणावाची पातळी कमी करण्यात मदत होईल.