सोशल मीडियावर सक्रीय असणारे, इंटरनेटचा वापर करणारे आपला पासवर्ड जोडीदारासोबत शेअर करतात असं ‘मॅक्फी’ संस्थेच्या एका अहवालातून समोर आलं आहे. ‘प्रायव्हसी’ आवश्यक असली तरी एकमेकांसोबत आपल्या सोशल अकाऊंट्स किंवा बँक खात्याचा पासवर्ड जोडीदारासोबत शेअर करण्यात भारतीयांना काहीच चुकीचं वाटत नाही असं ‘मॅक्की’च्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

इंटरनेटमुळे सामान्य भारतीय सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ व्यतित करत आहेत. आजच्या पीढीची जीवनशैली ही तंत्रज्ञानावर आधारलेली आहे पण असं असलं तरी हेच तंत्रज्ञान नात्यात अडथळा निर्माण करत असल्याचं ७७ टक्के भारतीयांचं मत आहे. तर दुसरीकडे दर चार पैकी एका भारतीयाला आपल्या जोडीदारावर नजर ठेवण्यासाठी सोशल मीडिया किंवा अॅप्लिकेशची मदत घ्यावी लागते, हे देखील या पाहणीतून समोर आलंय. यातल्या ४९% टक्के लोकांनी आपण दिवसातून दोनदा तरी जोडीदारावर नजर ठेवण्यासाठी या अॅपचा वापर करत असल्याचं कबुल केलं आहे. यात २१ ते ४० वर्ष वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे.

समोरासमोर भेट झाली तरीही आपले मित्र, कुटुंबीय किंवा जोडीदार सर्वाधिक वेळ फोनमध्ये घालवतात , त्यामुळे सतत भांडणं होतात असंही ८१ टक्के भारतीयांनी सर्वेक्षणात कबुल केलं. इतर लोकांच्या तुलनेत भारतीय सर्वाधिक आपला पासवर्ड शेअर करत असले तरी त्यांनी  खासगी माहिती शेअर करणं टाळायला हवं असं मॅक्फीचे उपाध्यक्ष व्यंकट कृष्णापूर यांनी सांगितले आहे.