आपले आरोग्य उत्तम राखायचे असेल तर आपला आहार समतोल असावा लागतो. त्यासाठी आपल्या रोजच्या खाण्यामध्ये काही साध्या पण पौष्टिक गोष्टींचा समावेश असायलाच हवा. मोड आलेली कडधान्ये हा समतोल आहाराचा सर्वात सोपा, महत्वाचा, शाकाहारी आणि तरीही स्वस्त व सहज मिळणारा घटक आहे. कडधान्याच्या समावेशामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.

पदार्थ कसे करता येतील…

कडधान्ये एका भांड्यामध्ये रात्रभर पाण्यात भिजत ठेवाव्यात. दुसऱ्या दिवशी त्यातील पाणी काढून टाकावे आणि त्यावर सुती कापड लावून किंवा एका सुती कापडात ती बांधून कोवळ्या सूर्यप्रकाशात ठेवावीत. काही वेळाने त्यांना मोड येतात. कडधान्यांच्या वाळलेल्या या बियांमध्ये जेव्हा पाणी शिरते तेव्हा त्यांना नवजीवन प्राप्त होते. त्यांना फुटणाऱ्या अंकुरांमध्ये जणू आरोग्य संजीवनी जागृत होते. मोड आलेली या कडधान्याची दुसऱ्या दिवशी उसळ बनवून तर खाता येतात, पण आणखी तीन ते सात दिवस भिजत ठेवले तर फुटलेल्या अंकुरांची आणि पानांची भाजी करून खाल्ली तर ती त्याहूनही पौष्टिक ठरते.

अन्नघटक – पचायला अत्यंत हलक्या असलेल्या कडधान्यामध्ये खालील घटक पुरेशा प्रमाणात असतात

प्रथिने- ८० टक्के हिस्सा प्रथिनांचा समावेश असतो.

पाचकरस- आपल्या आहारातील अन्नघटकांमध्ये असलेली जीवनसत्वे, खनिजे यांचा वापर शरीराच्या वाढीसाठी आणि रोजच्या हालचालीत खर्च होणारी शक्ती भरून काढण्यासाठी होतो.

फायबर- आपल्या शरीरातील दूषित पदार्थ, टाकाऊ रसायने शौचावाटे बाहेर पडण्यासाठी फायबरची म्हणजेच तंतुमय पदार्थांची गरज असते. हे फायबर आपल्याला कडधान्यातून मिळतात.

जीवनसत्वे- अ, ब, क, इ आणि के ही जीवनसत्वे मुबलक प्रमाणात मिळतात.

लोह- नियमित कडधान्य खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते आणि अॅनिमिया होत नाही. दैनंदिन जीवनात उत्साह टिकून राहतो. थकवा येण्याचे प्रमाण कमी होते.

फायटोन्यूट्रिअंट्स- हे वनस्पतीजन्य पौष्टिक पदार्थ रोग प्रतिकारशक्ती वाढवायला उपयुक्त असतात.
त्यांच्यापासून अ जीवनसत्व तयार होते. यातील ओमेगा फॅटीअॅसिड, कॅरोटिन, बायोटीन महत्वाचे असतात.

सल्फोराफेन- या वनस्पतीजन्य पदार्थामुळे कर्करोग टाळण्यास मदत होते.

खनिजे- खनिजे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात.

फायदे

१. केसांची वाढ होते, ते गळण्याचे थांबतात आणि गळलेले केस नव्याने उगवण्यास सहाय्य होते.

२. खराब झालेल्या सूक्ष्म रक्तवाहिन्या नव्याने तयार होतात आणि रक्तपुरवठा वाढतो. केसांच्या मुळाशी असलेल्या रक्तपुरवठ्यात वाढ होऊन केस दाट होतात.

३. डोळे आणि त्वचा निरोगी आणि चमकदार बनतात.

४. हार्मोन्सचा समतोल उत्तम राहतो आणि अकाली येणारे शारीरिक वृद्धत्व नियंत्रित होऊन व्यक्ती तरुण दिसू लागते.

५. त्वचेची शुष्कता कमी होते, डोक्यात कोंडा होण्याचे प्रमाण कमी होते.

६. त्वचेला पडणाऱ्या सुरकुत्या (रिंकल्स) घटतात.

७. युवक-युवतींना सतावणाऱ्या मुरुमांना प्रतिबंध होतो.

८. गर्भवती स्त्रियांना त्यांच्या त्वचा, केस आणि डोळ्यांच्या आरोग्यासमवेत त्यांच्या पोटातील बाळाची वाढसुद्धा चांगली होत राहते.

९. रक्तवाहिन्या उत्तम राहतात, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार नियंत्रित राहतात.

डॉ.अविनाश भोंडवे,

फॅमिली फिजिशियन