डॉ. शुभांगी महाजन
इलेक्ट्रोपोरेशन, ज्याला ‘नॉन-इंजेक्टेबल मेसोथेरपी’ असेही म्हटले जाते, हा त्वचेखालील उतींपासून ते खोल त्वचेपर्यंतच्या उतींना द्रावण देण्याचा एक कमी आक्रमक मार्ग आहे. या प्रक्रियेत हलक्या विद्युत ऊर्जेचा वापर करून उतींच्या आवरणावर तात्पुरती छिद्रे तयार केली जातात. परिणामी, नैसर्गिकरीत्या पोषण करणारी रसायने, औषधे किंवा इतर उत्पादने नंतर पेशींमध्ये हस्तांतरित करता येतात. शिवाय त्वचेतून जाणाऱ्या विद्युतलहरींमुळे स्थानिक मऊ उतींचे कंपन निर्माण होते आणि स्थानिक रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते.
इलेक्ट्रोपोरेशनचा वापर
- चेहऱ्याच्या त्वचेचे पुनरुत्थान
- सुरकुत्या
- मुरुमांचे चट्टे
- कोरडय़ा त्वचेला हायड्रेट करणे
- रोसेसियाशी संबंधित लालसरपणा कमी करणे
- वांगाच्या डागांवर उपचार करणे
- प्लास्टिक सर्जरीपूर्वीचे आणि नंतरचे उपचार
- चेहरा आणि मान मजबूत करणे
- वृद्धत्वविरोधी उपचार
- हायपर-पिग्मेंटेशन
- याव्यतिरिक्त केलोइड चट्टे, सेल्युलाइट, स्ट्रेच मार्क्ससाठी इलेक्ट्रोपोरेशनचा वापर केला जाऊ शकतो.त्वचेची वैयक्तिक स्थिती आणि गरजेनुसार विविध घटक वापरले जातात. (उदा. हायल्युरोनिक अॅसिड, व्हिटॅमिन सी, डी. एम. ई. ए., पॉली-व्हिटॅमिन, ग्लायकोलिक अॅसिड, रेटिनॉल, ट्रानेक्झेमिक अॅसिड)
इलेक्ट्रोपोरेशनचे फायदे
- त्वचेच्या वरच्या थरातून त्वचेची उत्पादने त्वचेच्या खोल स्तरापर्यंत पोहोचण्यास मदत करते.
- शरीरातील नैसर्गिक पोषक द्रव्यांची कमतरता भरून काढण्यास मदत करते.
- पेशींची क्रिया पुर्नसचयित करते आणि तुमच्या त्वचेच्या संपूर्ण आरोग्याला प्रोत्साहन देते.
- इलेक्ट्रोपोरेशन निरोगी, चमकणारी आणि सुंदर त्वचा प्राप्त करण्यास मदत करते. खालील विशिष्ट परिस्थितींमध्ये इलेक्ट्रोपोरेशनचा वापर करू नये.
- अॅलर्जी
- प्रकाश संवेदनशीलता
- अॅटोपिक त्वचारोग (संवेदनशील त्वचा)
- गर्भधारणा
- कोरडी, चिडचिड झालेली त्वचा
- मस्से (व्हायरल वॉर्ट)
- त्वचेवर कोणतेही सक्रिय व्हायरल संक्रमण
पूर्वप्रक्रिया सूचना
प्रथम तुमचा तपशीलवार वैद्यकीय इतिहास, उपचाराकडून तुमच्या अपेक्षा, त्याचे फायदे आणि मर्यादा यावर तुमचे त्वचारोगतज्ज्ञ चर्चा करतील. तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण केल्यानंतर संमतिपत्रकावर तुमची सही घेतली जाईल आणि प्रक्रिया सुरू होईल.
प्रक्रिया कशी कार्य करते?
- अॅसिटोनने तुमचा चेहरा स्वच्छ केल्यानंतर तुमचे डॉक्टर इलेक्ट्रोपोरेशन मशीनचा फेस प्रोब त्वचेच्या संपर्कात धरून त्यास लहान गोलाकार हालचालींमध्ये संपूर्ण चेहऱ्यावर फिरवतात.
- त्यामुळे औषध त्वचेच्या खोल थरात प्रवेश करते. जोपर्यंत सर्व औषधे पूर्णपणे शोषली जात नाहीत तोपर्यंत तुमचे डॉक्टर तुमच्या चेहऱ्यावर उपचार सुरू ठेवतील.
- प्रत्येक सत्राला सुमारे २० ते ४० मिनिटे लागतात.
इलेक्ट्रोपोरेशन ही दीर्घकालीन उपचार पद्धत आहे. बऱ्याच रुग्णांना इष्टतम परिणामकारकतेसाठी १५ ते २० दिवसांच्या अंतराने सहा ते आठ सत्रांची आवश्यकता असते.